प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा डाएटच्या बाबतीत खूप स्ट्रीक्ट असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. नेहमी आरोग्यासाठी फायदेशीर गोष्टी खाताना ती दिसते, इतकेच नाही तर कित्येक वेळा ती याबाबत सोशल मीडियावर खुलेपणाने बोलतेही. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टेटस शेअर केले होते. ज्यामध्ये तिने पांता भात हा बंगाली पदार्थ पोस्ट केला होता. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला भूक लागत नाही, तोंडाची चव जाते अशावेळी आपली आवडती एखादी डीश करुन आपण स्वत:ला फ्रेश ठेवले तर? अनुष्कानेही कदाचित हाच विचार करुन हा आगळावेगळा पदार्थ केला असेल आणि खाल्ला असेल. अनुष्का नेहमी तिने केलेले वेगवेगळे प्रयोग सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आताची रेसिपीही तिने अशीच पोस्ट केली आहे. पोस्ट केलेल्या फोटोतील पदार्थ दिसायला जितके आकर्षक दिसत आहेत तितकेच ते ही रेसिपी पौष्टीक असल्याचे म्हटले जात आहे. आता पांता भात म्हणजे नेमके काय आणि हा प्रकार कसा केला जातो ते पाहूया...
साहित्य -
१. भात - २ कप
२. कांदा - १
३. लिंबू - १
४. तेल - १ चमचा
५. मीठ - आवडीनुसार
कृती -
१. शिजवलेला भात एका वाडग्यात घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून त्यावर झाकण टेवून हा भात रात्रभर ठेवून द्या.
२. दुसऱ्या दिवशी सकाळी यामध्ये चिरलेला कांदा, लिंबू, तेल आणि मीठ घालून खायला घ्या.
३. या भातातील पाण्यात पोषणमूल्ये असल्याने हे पाणी फेकून देऊ नका.
४. साधारणपणे हा भात विविध प्रकारच्या माशांसोबत खाल्ला जातो. पण अनुष्का शाकाहारी असल्याने वांग्याचे काप, उकडलेला बटाटा आणि भजी, कांदा, मिरची यांच्यासोबत ती हा भात खात असल्याचे दिसते.
५. आपणही साईड डिश म्हणून आपल्या आवडीचे पदार्थ या भातासोबत खायला घेऊ शकतो.