श्रावण हा जसा विविध सणांचा, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा महिना आहे तसा तो व्रत वैकल्यांचा देखील आहे. अनेकजण श्रावणात महिनाभराचे उपवास धरतात. सकाळी उपवास करायचा आणि संध्याकाळी जेवायचं. तर अनेकजण संपूर्ण महिना उपवास धरत नसले तरी श्रावणात ते वेगवेगळ्या वारी उपवास धरतात. उपवासाला केवळ धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून बघून चालत नाही. तर आरोग्याच्या बाजूनेही उपवासाचा विचार व्हायला हवा.
दिवसभर कडक उपवास धरुन रात्री जेवण करुन तो सोडल्यानंतर अनेकांना बध्दकोष्ठता, पोट दुखणे किंवा वजन वाढण्यासारख्या समस्या जाणवतात. उपवासाला काय खावं याचा जसा बारकाईनं विचार व्हायला हवा तसाच विचार उपवास सोडताना काय खावं याचाही होणं गरजेचं आहे. उपवास सोडल्यानंतर अनेकांना आळस येतो, अंग जड झाल्यासारखं होतं, जेवल्यानंतर थकवा वाटायला लागतो. त्यामुळेच उपवास सोडताना आणि सोडल्यानंतर काय खायला हवं ज्यामुळे आरोग्य चांगलं राहिल हे जाणून घेणं आवश्यक आहे. या विषयातल्या तज्ज्ञांनी उपवास सोडताना, सोडल्यानंतर काय खावं आणि का खावं याची सविस्तर माहिती दिली आहे.
छायाचित्र- गुगल
उपवास सोडताना- सोडल्यावर काय खावं?
1. खीर - उपवास सोडताना जेवणात रव्याची, तांदळाची , गव्हाची, दलियाची किंवा शेवयाची खीर खावी. कारण खीरीमधे प्रथिनं आणि कर्बोदकं असतात. या आहार घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. उपवास सोडताना खीर खाल्ल्यास उपवास सोडल्यानंतर अशक्तपणा वाटण्याची तक्रार दूर होते. फक्त खीर करताना त्यात साखरेचा वापर जपून करावा, यामुळे वजन वाढत नाही. वजनाच्या दृष्टिकोनातून अजून सुरक्षित उपाय म्हणजे खीरीत साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.
2. लिंबू पाणी- उपवास सोडून झाल्यावर थोड्या वेळानं लिंबू पाणी प्यावं. उपवासामुळे पोटात तयार होणारं आम्लं या लिंबू पाण्यामुळे निघून जतं. हवं तर उपवास सोडून झाल्यावर लिंबू पाण्याऐवजी एक संत्री खाल्ली तरी चालते. उपवासामुळे शरीरात जो शुष्कपणा तयार होतो, पाण्याची कमतरता निर्माण होते ती भरुन निघते आणि अशक्तपणा जाणवत नाही. लिंबू पाणी, संत्री यात असलेले अँण्टिऑक्सिडण्टस आणि क जीवनसत्त्वं शरीराला तातडीनं ऊर्जा आणि शक्ती देतात.
छायाचित्र- गुगल
3. अंजीर आणि बेदाणे- उपवास सोडताना एक दोन अंजीर आणि बेदाणे आवर्जून खायला हवेत. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं. हे प्रमाण जर बरोबर असेल तर मग थकवा जाणवत नाही. उपवास सोडल्यानंतर थोड्या वेळानं अंजीर एक ग्लास कोमट दुधासोबत घेतलं तरी ते शरीराला ताकद देतं. बेदाणे, अंजीर हा सुकामेवा उपवासानंतर येणारा गळपटलेपणा दूर करतो.
4. केळ किंवा सफरचंद- उपवास सोडल्यानंतर एखाद केळं किंवा सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं. कारण यात फ्लेवोनॉइडस, अँण्टिऑक्सिडण्टस आणि खनिजं असतात. या घटकांमुळे उपवासानं येणारा अशक्तपणा येत नाही. शिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
छायाचित्र- गुगल
5. खजूर- उपवास सोडल्यानंतर दोन तीन खजूर खाल्ल्यास शरीराला लगेच ऊर्जा मिळते. उपवासामुळे येणारा अशक्तपणा घालवण्यासाठी खजूर खाणं खूप महत्त्वाचं आहे. खजुरामधे फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पचन नीट होतं. उपवासानंतर जाणवणार्या पोटाच्या तक्रारी खजूर खाल्ल्यास दूर होतात.
6. मिश्र धान्यांची पोळी- उपवास सोडताना केवळ गव्हाची पोळी खाण्याऐवजी मिश्र धान्यांची ( मल्टीग्रेन पिठाची) पोळी खावी. भाज्यांमधे भोपळा, डांगर, टमाटे, भेंडी, डाळ आणि दही खाण फायदेशीर ठरतं. मल्टीग्रेन पोळी आणि या भाज्या पचायला हलक्या असतात. दिवसभर उपवास करुन जड जेवल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि पोटाच्या तक्रारी उद्भवतात. हे टाळण्यासाठी वर सांगितलेले पर्याय योग्य ठरतात.