Join us  

५ मिनिटांत तयार होणारे बडीशेप सरबत प्या, उष्णता आणि पचनाच्या विकारावर प्रभावी गारेगार उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 4:51 PM

Fennel Badishep Sarbat Recipe Summer Special : लिंबू, कोकम सरबताला हटके पर्याय, उन्हाळा होईल सुसह्य...

उन्हाळ्याच्या दिवसांत भर उन्हातून घरी आलो की आपल्याला काहीतरी गारेगार प्यावेसे वाटते. अशावेळी आपण आवर्जून कसलं ना कसलं सरबत करतो. यामध्ये प्रामुख्याने लिंबू, कोकम नाहीतर आवळा यांचा समावेश असतो. एरवी आपण कोणी पाहुणे आले की अगदी सहज चहा किंवा कॉफी विचारतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र आल्या गेलेल्यांनाही शरीराला थंडावा देणारं सरबत दिलं जातं. या सरबतामध्ये नेहमीपेक्षा थोडं वेगळं ट्राय करायचं असेल आणि शरीराला थंडावा द्यायचा असेल तर बडीशेपचे सरबत हा उत्तम पर्याय ठरु शकतो. घरात सहज असणाऱ्या पदार्थांपासून होणारे हे सरबत चविष्ट तर लागतेच पण आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. याची पावडर आधीच तयार करुन ठेवली तर ऐन सरबत करण्याच्या वेळी आपण ती वापरु शकतो. अगदी ५ मिनीटांत हे गारेगार सरबत तयार होते. पाहूयात या सरबताची सोपी रेसिपी (Fennel Badishep Sarbat Recipe Summer Special)...

१. पॅनमध्ये १ वाटी बडीशेप २ मिनीटे हलकी भाजून घ्यावी. 

२. २१५ ते १७ वेलची घालून पुन्हा हलके भाजावे. 

३. मग हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे. 

४. त्यामध्ये २ चमचे खसखस आणि ४ ते ५ काळी मिरी घालावी. 

५.  यात ३ वाट्या साखर घालून मिक्सरमध्ये हे सगळे बारीक करुन घ्यायचे. 

६. मिक्सर केल्यानंतर हे मिश्रण गाळणीने गाळून वर राहीलेला चोथा फेकून द्यायचा. 

७. गाळलेली बारीक पूड एका बरणीत भरुन फ्रिजमध्ये ठेवायची, ही पूड ६ महिने चांगली राहते.

८. जेव्हा सरबत हवं असेल तेव्हा ही तयार केलेली १ चमचा पावडर ग्लासमध्ये घेऊन त्यात पाणी आणि बर्फ घालावा आणि एकजीव करुन हे सरबत प्यावे.

 बडीशेप सरबत पिण्याचे फायदे (benefits of drinking badishep sharbat)

१. बडीशेप आणि खडीसाखर हे दोन्हीही शरीराला थंडावा देणारे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना बडिशेप सरबत पिणे आरोग्यदायी ठरते.

२. बडीशेपेत फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनासाठी उत्तम असते.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बडीशेप काम करते. 

४. शरीरातील चांगल्या कोलेस्टरॉलचं प्रमाण वाढण्यासाठी मदत करते.

५. बडीशेप आणि खडीसाखर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, दाह कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात.   

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल