Join us  

मेथीची भाजी, पराठे कडवट होतात? मेथीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 3:13 PM

आरोग्यासाठी उत्तम असलेली मेथी कडू असल्याने टाळली जाते, पण सोप्या टिप्स वापरुन हा कडवटपणा कमी करता आला तर...

ठळक मुद्देमेथीची भाजी कशीही केली तरी कडवट होते? कडवटपणा घालवण्याचे सोपे उपाय...मेथीचा कडवटपणा कसा घालवायचा असा प्रश्न असेल तर वाचा

मेथी आरोग्यासाठी अतिशय चांगली असते. मधुमेह किंवा इतरही आजारांसाठी मेथी खाण्याचा फायदा असल्याने मेथीची भाजी आवर्जून खायला हवी असे आपण अनेकदा ऐकतो. कडू असले तरी कारले ज्याप्रमाणे औषध म्हणून खायला हवे, त्याचप्रमाणे मेथीही कडू असली तरी खायला हवी हे नक्की. सध्या हिवाळ्यात बाजारात सगळ्या भाज्या अतिशय स्वस्त आणि मस्त मिळतात. अशावेळी भरपूर मेथी आणली जाते. मग कधी परतून भाजी, कधी पातळ भाजी, कधी मेथीची कढी तर कधी पकोडे. मेथीचे पराठे आणि पुऱ्या तर नेहमीच्याच. काही जण मेथी अगदी आवडीने खातात तर काही जण औषध म्हणून पण मेथी कडू लागते म्हणून नाक मुरडणारेही बरेच जण असतात. पण आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ही मेथीची भाजी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खायला हवी. आता मेथीच्या भाजीचा किंवा पराठ्याचा कडूपणा कमी करण्यासाठी काय करता येईल ते पाहूया.  

(Image : Google)

मेथी खाण्याचे फायदे 

१. मेथीतील फायबरमुळे वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. 

२. कोलेस्टेरॉल ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. मेथीमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३. थंडीच्या दिवसांत आपल्याला पचनाच्या तक्रारी उद्भवतात. पचनसंस्थचे कार्य सुरळीत होण्यासाठी मेथी उपयुक्त ठरते.

४. केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा, केस चांगले होण्यासाठीही मेथी खाण्याचा फायदा होतो. 

५. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी आहारात मेथी असणे फायदेशीर असते.

मेथीचा कडवटपणा कमी करण्याचे उपाय

१. मेथीची परतून भाजी किंवा पराठे करताना मेथी निवडल्यानंतर ती चिरु नये. भाजी किंवा पराठे, पुऱ्या करण्यासाठी पूर्ण पाने धुवून तशीच्या तशी वापरावीत. त्यामुळे मेथी कडू लागत नाही. 

२. मेथीची परतून भाजी भाजी करताना त्यामध्ये कांदा जास्त प्रमाणात घालावा म्हणजे मेथीचा कडवटपणा मारला जातो. तसेच यामध्ये तुम्ही दाण्याचा कूट किंवा ओले खोबरे यांचाही वापर करु शकता.

३. याबरोबरच मूगाची भिजवलेली डाळ आणि लसूण घालूनही आपण मेथीची परतून भाजी करु शकतो. लसूण आणि मूग डाळ यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते. 

४. मेथीची परतून भाजी करत असताना त्यामध्ये कांद्याबरोबरच टोमॅटो आणि पनीर घातल्यास मेथी पनीर अतिशय छान होते. 

५. सध्या मटारचा सिझन आहे, अशावेळी तुम्ही मेथी मटार मलाई ही भाजीही अगदी झटपट करु शकता. त्यामुळे मेथी तर पोटात जातेच पण ही भाजी हॉटेल स्टाईल असल्याने घरातील सगळे ती अतिशय आवडीने खातात. 

(Image : Google)

६. मेथीची कोणत्याही प्रकाराने भाजी करत असाल तरी त्यात थोडीशी चवीपुरती साखर घातली तर हा कडवटपणा दूर होण्यास मदत होते. 

७. मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते. पीठ एकजीव होते आणि पराठे कोरडे आणि कडवट न होता अतिशय लुसलुशीत होण्यास मदत होते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीभाज्या