उन्हाळ्यात आंबट- चिंबट पदार्थ भारीच खावेसे वाटतात. तेवढे प्रकर्षाने ते हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खावेही वाटत नाहीत आणि पानात घेतले तरी खूप काही जातही नाहीत. पण उन्हाळ्यात मात्र कैरीपासून तयार झालेले विविध पदार्थ, दही, ताक असे सगळे आंबट पदार्थ अगदी आवडीने खाल्ले जातात. जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी आणि उन्हाळा बाधू नये, यासाठी कच्चा कांदा टाकून केलेली कोशिंबीर, रायतंही जेवणात हवंच. म्हणूनच तर हा घ्या तसाच एक चवदार पदार्थ. उकडलेले बटाटे (aloo ka raita), थंडगार दही आणि इतर अनेक पदार्थ घालून तयार केलेलं हे आलू रायतं (Easy recipe of delicious aaloo raita) म्हणजे आहाहा......
आलू रायता करण्यासाठी लागणारं साहित्य
२ ते ३ उकडलेले बटाटे, १ टेबलस्पून ते, १ टी स्पून मोहरी आणि जिरे, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १५० ग्रॅम दही, ३ ते ४ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, लसूण आणि लाल मिरचीची एकत्रित पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा २ टेबलस्पून, चाटमसाला, मिरीपूड, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर हिंग.
कसं करायचं आलू रायतं? (aaloo raita recipe)
- एका मोठ्या भांड्यात दही घ्या. दह्यामध्ये लसूण- मिरची पेस्ट, थोडा चाट मसाला, मिरेपूड टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. छोटी कढई तापवून घ्या आणि त्यात जिरे, मोहरी, लसूण, मिरच्यांचे तुकडे, हिंग असं सगळं टाकून खमंग फोडणी करून घ्या.
- आता दह्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे लहान लहान तुकडे करून टाका. बारीक चिरलेला कांदा टाका. वरून खमंग फोडणी घाला. चवीनुसार मीठ टाकलं की सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. वरतून छानपैकी कोथिंबीर भुरभुरा. मस्त चवदार आलू रायते झाले तयार.
- जेवणाचा कोणताही बेत असला तरी तुम्ही त्यासोबत तोंडी लावायला आलू रायते अगदी चवीने खाऊ शकता.