वरण- भात, भाजी- पोळी असं एवढंच पानात वाढलं की ताट कसं रिकामं- रिकामं वाटू लागतं. त्याच्या सोबतीला एखादी कोशिंबीर, एखादं लोणचं आणि खमंग चटकदार चटणी (chutney recipe) असा सगळा बेत जमून आला की मग जेवणातही रंगत येते. लोणचं, कोशिंबीर, चटणी हे खरंतर ताटाच्या एका कोपऱ्यात बसणारे पदार्थ. पण तरीही त्यांच्याशिवाय जेवणात काही रंगत नाही. म्हणूनच तर तुमच्या जेवणाची रंगत आणखी वाढविण्यासाठी आणि तोंडाची चव खुलविण्यासाठी ही घ्या झणझणीत खमंग लसूण चटणी.. (lasun khobara chutney)
लसूणमुळे खरोखरंच जेवणाची रंगत वाढते. कोणत्याही पदार्थाला लसणाची जोड दिली की तो पदार्थ कसा आणि झकास होऊन जातो. आता खोबरं, शेंगदाणे या चटण्या आपण करतोच. पण जेव्हा या चटण्यांमध्ये लसूण टाकला जातो, तेव्हा मात्र त्या चटण्या आधिक खमंग होतात. हल्ली उन्हाळ्यात जेवण जरा कमीच जातं. अनेक जणांची तर जेवणाची मुळीच इच्छा होत नाही. अशावेळी जर त्यांच्या ताटात तोंडी लावायला खोबरं- लसूण (dry coconut and garlic chutney) घालून केलेली खमंग चटणी वाढली तर निश्चितच दोन घास अधिकचे पोटात जातील. म्हणूनच तर खाेबरं- लसूण चटणी कशी करायची, याचीच ही खास रेसिपी.
खोबरं- लसूण चटणी रेसिपी
- ही चटणी करणं अतिशय सोपं आहे. फक्त पदार्थांचं योग्य प्रमाण जमून आलं पाहिजे.
- शिवाय एअर टाईट डब्यात पॅक केली तर अगदी १५ दिवस ही चटणी चांगली राहू शकते.
- चटणी करण्यासाठी आपल्याला एक वाटीभरून खोबऱ्याचे काप, लसूणाच्या १० ते १५ पाकळ्या, अर्धा टीस्पून जिरे, एक टेबलस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य लागणार आहे.
- सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवा आणि जिरे थोडेसे भाजून घ्या.
- जिरे भाजून घेतल्यानंतर खोबऱ्याचे काप भाजून घ्या. यावेळी गॅस मंद ठेवावा. खोबरे जास्त लालसर भाजू नका. नाहीतर चटणीला भाजकट, जळकट वास लागतो.
- खोबरे भाजल्यानंतर कढईतून काढून घ्या आणि नंतर लसूण थोडा भाजून घ्या.
- खोबरे, लसूण, जिरे थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. तिखट- मीठ टाका आणि चटणी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या.
- चटणीला ओलसरपणा यावा म्हणून काही जण चटणी मिक्सरमधून फिरवतानाच त्यात अर्धा चमचा तेल टाकतात. तुम्हालाही ओलसर चटणी आवडत असेल तर तेल टाका.
- साध्या वरण भातासोबत जरी ही चटणी खाल्ली तरी तिची चव कमाल लागते.
खोबरे खाण्याचे फायदे
- खोबरे मेंदू आणि हृदयासाठी चांगले असते.
- खोबरे खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते.
- शरीरातील रक्तप्रवाह चांगला ठेवण्यास खोबरे उपयुक्त ठरते.
लसूण खाण्याचे फायदे
- उन्हाळ्यात अनेकांना पचनाचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी लसूण खाणे फायद्याचे ठरते.
- लसूणामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, मँगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असते.
- शरीरातील चांगले काेलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यास लसूण उपयुक्त आहे.