उन्हाळ्यात दही घालून तयार केलेली एखादी कोशिंबीर तोंडी लावायला असली की जेवणाची रंगत वाढतेच.. पण कधीकधी त्याच- त्याच कोशिंबीरीचा कंटाळा येऊ लागतो. कोशिंबीरीमध्येही काही तरी टेस्टी बदल व्हावा असं वाटतं.. असंच जर तुमचंही झालं असेल तर करून बघा ही एक छान, चटपटीत आणि चटकन होणारी रेसिपी. पहाडी रायता (pahadi raita) ही रेसिपी खास हिमालय प्रांतातली असून सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी ती इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केली आहे. डिहायड्रेशन, तोंडाची चव जाणे अशा अनेक समस्या उन्हाळ्यात जाणवतात. हे सगळे त्रास कमी करण्यासाठी आठवड्यातून एक- दोनदा पहाडी रायत्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही..
पहाडी रायता करण्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी दही, २ मध्यम आकाराच्या काकड्या, तेल, पहाडी जीरे, चवीनुसार मीठ, मिरची, हिंग
पहाडी रायता रेसिपी (Pahadi Raita Recipe)
- पहाडी रायता करण्यासाठी एका बाऊलमध्ये दही घ्या आणि चमच्याने भरपूर फेटून ते एकसारखे करून घ्या.
- दही व्यवस्थित फेटून झाल्यानंतर त्यात एक टीस्पून मोहरीचे तेल टाका. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. रायता करण्याच्या अर्धा तास आधी हे मिश्रण तयार ठेवा. जेणेकरून मोहरी तेलाचा छान स्वाद रायत्याला लागतो.
- काकडीच्या बारीक फोडी करून घ्या. आता काकडीच्या फोडी तेल घालून कालवलेल्या दह्यात टाका.
- आता एका छोट्या कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घ्या. त्यात मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, पहाडी जीरे, हिंग टाकून फोडणी करून घ्या. फोडणीसाठी तुम्ही तूपही वापरू शकता.
- फोडणी तडतडल्यानंतर ती आपल्या काकडी आणि दही एकत्र केलेल्या बाऊलमध्ये टाका.
- सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतले की झाला पहाडी रायता तयार..
उन्हाळ्यात का खावा पहाडी रायता (benefits of eating pahadi raita)
- काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात होणारा डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी काकडी खाणे उपयुक्त आहे.
- काकडी आणि दही हे दोन्ही पदार्थ शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरतात.
- कॉन्स्टिपेशन, ॲसिडीटी असे त्रास कमी करण्यासाठी काकडी खाणे उपयुक्त ठरते.
- काकडीमुळे त्वचा तजेलदार, चमकदार होते.
- उन्हामुळे अनेकदा काही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे तोंडाची चव गेली असेल तर असा हा मस्त रायता करा आणि जेवणात तोंडी लावा..