कैरीचं लोणचं, तक्कू, मेथांबा, साखरअंबा, गुळांबा एवढंच काय तर कैरीची चटणी, ठेचा, वरण आणि अगदी पन्हं देखील आपण नेहमीच चाखतो. आता जरा आणखी एक वेगळा मेन्यू करून पहा. करायला सोपा आणि खायला अगदीच चटपटीत, खुसखुशीत.. कैरीची आंबट- गोड जिलेबी.. जिलेबीची चव तर अशी झकास होते की खाणारा प्रत्येक जण खुश होऊन जाईल. कैरीच्या जिलेबीची ही रेसिपी Yummy या युट्युब पेजवर शेअर करण्यात आली आहे. (recipe from raw mango)
कैरीची जिलेबी करण्यासाठी लागणारं साहित्य
२ कैऱ्या, २ वाट्या साखर, १ कप मैदा, १/४ कप कॉर्न फ्लॉवर, अर्धा टीस्पून बेकींग सोडा, तळण्यासाठी तेल, २ टीस्पून लिंबाचा रस, ५ ते ६ थेंब खाण्याचा हिरवा रंग आणि पाणी.
कैरी जिलेबी रेसिपी? (kairi jalebi recipe)
- सगळ्यात आधी कैरी किसून घ्या. किसलेला गर एका स्वच्छ कापडात टाका आणि त्यातून कैरीचं पाणी काढून घ्या.
- आता एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, बेकींग सोडा घ्या. त्यात आपण काढलेलं कैरीचं पाणी टाका. खाण्याचा जो हिरवा रंग असेल त्याचे ४ ते ५ थेंब टाका. साधं पाणी टाकून हे मिश्रण सैलसर भिजवून घ्या.
- आता जिलेबीसाठी पाक तयार करून घ्या. यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यात २ कप साखर आणि १ कप पाणी घाला. या मिश्रणाला चांगली उकळी आली की त्यात खाण्याचा हिरवा रंग ४ ते ५ थेंब टाका तसेच लिंबाचा रस टाका. उकळी येऊन त्याचा पाक करून घ्या.
- आता दुसऱ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवा. त्यात आपण तयार केलेल्या मिश्रणाच्या जिलेब्या करून तळून घ्या. जिलेबी छान तळल्यानंतर आपण तयार केलेल्या पाकात टाका. पाकात दोन- तीन मिनिटे मुरली की बाहेर काढा आणि पाक निथळून घ्या. छान आंबट- गोड चवीची कुरकुरीत जिलेबी झाली तयार.