पहिला पाऊस पडून गेलाय त्यामुळे आता घरोघरी लोणचं (mango pickle) घालण्याचं काम सुरु आहे. वर्षभर पुरेल असं लोणचं एकदाच घालून ठेवलं की मग जेवणात तोंडी लावायला काय, हा प्रश्नच उरत नाही. मसाले घालून पारंपरिक पद्धतीने लोणचं तर सगळ्याच घरांमध्ये होतं. पण काही सुगरण मैत्रिणी त्यातही वैविध्य आणायचा प्रयत्न करतात. कुणी तिळाचं लोणचं करतं तर कुणी लसूणाचं, कुणी कारळाचं तर कुणी गुळ घालून आंबट- गोड चवीचं...(Mango Pickle with sweet flavour) प्रत्येक लोणच्याची एक वेगळीच खासियत आहे. पण कैरीच्या आंबटपणात, मसाल्यांच्या तिखटपणात जर तुम्हाला गुळाची मिठास हवी असेल, तर करून बघा हे गुळ- कैरीचं चटपटीत लोणचं.
लोणचं वर्षभर टिकण्यासाठी अशी काळजी घ्या
- लोणच्याच्या कैऱ्या आंबट आणि कडक असायला पाहिजेत.
- या लोणच्यात आपण गुळ घालणार असल्याने मीठ थोडं कमी लागेल.
- लोणच्यासाठी वापरण्यात येणारी सगळी भांडी, साहित्य एकदम स्वच्छ आणि कोरडं हवं. त्यात पाण्याचा अजिबात अंश नको.
- लोणच्यात घालण्याचे सगळे पदार्थ भाजून घ्या आणि त्यानंतर थंड करूनच घाला.
- लोणच्यासाठी फोडी करूल आणल्यावर खूप वेळ तशाच ठेवू नका. लगेच त्याचं लोणचं घाला.
गुळ- कैरी लोणचं रेसिपी
साहित्य
कैरीच्या फोडी १ किलो, गुळ अर्धा किलो, मोहरीची डाळ १०० ग्रॅम, धने ५० ग्रॅम, मेथील दाणे २५ ग्रॅम. लवंग दालचिनी जायफळ एकेक चमचा, कश्मिरी लाल तिखट आणि मीठ चवीनुसार. तेल पावशेर.
रेसिपी
- मेथ्या, धने, मिक्सरमधून स्वतंत्रपणे वाटून घ्या. आणि वेगवेगळे ठेवा. जाडसर वाटण करावे. एकदम बारीक पूड करू नये.
- लवंग, दालचिनी, जायफळ एकत्र करून वाटून घ्या. याची पुड जरा बारीक करावी.
- कढई तापवून घ्या. त्यात तेल गरम करून घ्या. उकळू नका.
- तसेच मोहरीची डाळही मध्यम आचेवर साधारण २ मिनिटे भाजून घ्या.
- डाळ काढून घ्या आणि नंतर त्याच पॅनमध्ये बारीक केलेले धनेपूड, मेथ्याची पूड, लवंग- दालिचनी- जायफळ पावडर एकानंतर एक टाकून भाजून घ्या.
- एका मोठ्या भांड्यात कैरीच्या फाेडी आणि गुळ एकत्र करून घ्या.
- व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यात आता आपण जे भाजून, मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे, ते सगळं साहित्य एकेक करून टाका, नंतर चवीनुसार मीठ टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- आता हे लोणचं काचेच्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा. त्यानंतर बरणीत वरतून तेल टाका.
- बरणीचं झाकण लावून ती ठेवून द्या. २ दिवसांत गुळाचं छान पाणी होईल आणि लोणचं जवळपास निम्म्याने खाली गेलेलं असेल. लोणचं पुन्हा एकदा छान हलवून घ्या. मस्त आंबटगोड लोणचं मुरेल तसं आणखी चवदार लागेल.