कधीकधी सकाळी केलेल्या पोळ्या रात्री खूप उरतात. मग पोळ्यांसोबत भाजी किंवा वरण करून खाणे हे झाले आपले नेहमीचेच काम. पण तेच तेच भाजी- पोळी, वरण- पोळी, पिठलं पोळी असं खाण्याचा कधीकधी जाम कंटाळा येतो. म्हणूनच तर ही बघा एक मस्त रेसिपी.. उरलेल्या पोळ्यांपासून (leftover chapati) तंदूर पनीर रॅप हा पदार्थ अतिशय झटपट बनवता येतो. पोळ्या, पनीर आणि काही भाज्या यांचं कॉम्बिनेशन असलेला हा पदार्थ नक्कीच हेल्दी आहे. ही सुपर यम्मी रेसिपी इन्स्टाग्रामच्याlife_of_a_foodholic या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे.
तंदूर पनीर रॅप करण्यासाठी लागणारं साहित्य
पोळ्या, पनीर, दही, तिखट, गरम मसाला, मीठ, हरबरा डाळीचं पीठ, हळद, जीरेपूड, पुदिना फ्लेवर मेयोनिज, चीज, कांदा, काकडी, कोबी, कोथिंबीर आणि तूप.
कसा करायचा तंदूर पनीर रॅप?
(How to make Tandoor Paneer Wrap)
- हा पदार्थ करण्यासाठी सगळ्यात आधी पनीर मॅरीनेटेड करून घ्यावं. यासाठी दोन टेबलस्पून दही, तिखट, गरम मसाला, मीठ, जिरेपूड, हळद आणि अर्धा टेबलस्पून डाळीचं पीठ हे साहित्य एका बाऊलमध्ये घ्या. त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून व्यवस्थित घोळून घ्या.
- आता एका पॅनमध्ये थोडंसं बटर टाका. त्यात हे पनीर टाकून फ्राय करून घ्या.
- एका बाऊलमध्ये कांदा, कोथिंबीर, काकडी, कोबी या भाज्या बारीक चिरून टाका. तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या टाकू शकता किंवा कमीही करू शकता.
- आता पोळी घ्या. पोळीला अर्धा छेद द्या. आता पोळीच्या चार चतकोर भागांमध्ये आपल्याला वेगवेगळं साहित्य टाकायचं आहे. एका भागात फ्लेवर्ड मेयोनिज लावा, दुसऱ्या भागात पनीर टाका. तिसऱ्या भागात भाज्या टाका आणि चौथ्या भागात चीज स्लाईस ठेवा. जिथून पोळी कापली आहे, तिथून ती दुमडायला सुरुवात करा. पोळी दोनदा दुमडल्यावर जशी दिसते, तशी ती आता दिसेल आणि त्यात आपण भरलेल्या साहित्याच्या चार लेअर्स दिसतील.
- आता या पोळीला खालून- वरून तूप लावा आणि ती तव्यावर खमंग भाजा. सॅण्डविज मेकरमध्ये ठेवून ग्रिल केले तरी चालते.
- गरमागरम तंदूर पनीर रॅप खाण्यासाठी झाले तयार..