दोडक्याची भाजी हे ऐकूनच अनेकजण नाराज होतात. पण आरोग्यासाठी दोडके अतिशय फायदेशीर आहे. दोडक्याची भाजी आवडत नसणाऱ्यांना दोडक्याची खमंग, क्रिस्पी चटणी नक्कीच आवडेल. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर प्रोटिन्स, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स देखील दोडक्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे दोडक्याची भाजी तर खावीच पण त्याच्या सालांचा देखील पुरेपूर उपयोग करून घ्यावा.
दोडक्याच्या सालांच्या चटणीसाठी लागणारे साहित्य
दोडक्याची साले, तेल, मीठ, मोहरी, हिंग, हळद, तिखट आणि तीळ.
कशी करायची दोडक्याची चटणी?
१. दोडक्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी दोडके सोलून घ्या. दोडक्याच्या साली पाण्यात टाकून व्यवस्थित धुवून घ्या.
२. आता एखादा तवा किंवा कढई गॅसवर तापायला ठेवा.
३. तवा चांगला तापला की त्यावर तेल टाका. तेल गरम झाल्यावर मोहरी टाका.
४. मोहरी तडतडली की त्यामध्ये चिमुटभर हळद आणि तेवढाच हिंग टाकावा.
५. यानंतर एक टेबलस्पून तीळ टाकावेत.
Photo Credit- Google
६. गरम तेलात तीळ लगेचच चांगले फुलून येतात. तीळ फुलून आले की लगेचच त्यामध्ये दोडक्याच्या साली टाकाव्यात आणि चांगल्या परतून घ्याव्या.
७. साली अर्धवट परतून झाल्या की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट टाकावे.
८. ही रेसिपी करताना तव्यावर झाकण ठेवू नये. जेव्हा दोडक्याची साले लालसर होऊ लागतीत आणि कुरकुरीत होत जातील, तेव्हा ती व्यवस्थित परतल्या गेली आहेत असे समजावे आणि गॅस बंद करावा.
९. गॅस बंद केला तरी काही वेळ चटणी तशीच तापलेल्या तव्यावर राहू द्यावी. यामुळे सालांचा कुरकुरीतपणा आणखी वाढतो आणि चटणी खूपच खमंग लागते.
Photo Credit- Google
दोडके खाण्याचे फायदे
ज्यांना कायम जंतांचा त्रास होऊन पोट दुखते त्यांच्यासाठी दोडके अतिशय गुणकारी आहे. याशिवाय ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशांनीही दोडक्याची भाजी खावी. शरीराला ताकद देण्याचे काम दोडक्याची भाजी करते. दोडक्यामध्ये पोटॅशियम मोठ्य प्रमाणात असते. किडनीस्टोनचा आजार असलेल्यांसाठीही दोडके फायदेशीर आहे.