Join us  

स्टफ पराठा लाटताना फुटतो, सगळा चिकचिकाट होतो? 'असा' लाटा पराठा, न फुटता टम्म फुगेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 1:04 PM

बटाट्याचा पराठा असो की अन्य कोणता स्टफ पराठा. पराठा लाटताना किंवा भाजताना व्हायचा तोच गोंधळ होतो पराठा फुटतो. मग सगळं स्टफिंग बाहेर येतं आणि सगळा चिकचिकाट.... हे सगळं टाळायचं असेल तर पराठा लाटताना काही ट्रिक्स फॉलो करून बघा.

ठळक मुद्दे स्टफ पराठा लाटताना आणि भाजताना थोडी काळजी घेतली पाहिजे.

पनीर पराठा, आलू पराठा, मिक्स व्हेज पराठा असा कोणताही स्टफ पराठा जर गरमागरम सर्व्ह केला तर लहान मुलांनाच काय पण मोठ्या माणसांनाही आनंद होताे. घरातली स्त्री असा हा सगळ्यांच्या आवडीचा स्टफ पराठा बनवायला मोठ्या उत्साहात सुरूवात तर करते. पराठे मस्त लाटता आले आणि छान फुगून आले तर पराठे करायला पण मजा येते. पण बऱ्याचदा पराठा लाटताना आणि भाजताना सगळा गोंधळ उडतो. पराठा फुटतो, सगळं पीठ बाहेर येतं, मग पोळपाट आणि लाटणं जणू त्या पीठाने बरबटून जातं. हा सगळा राडा पाहून वाटतं की कुठून हा पराठा बनविण्याचा घाट घातला. असा अनुभव थोड्या फार फरकाने बहुतांश जणींनी घेतलेला असताे. म्हणूनच स्टफ पराठा लाटताना आणि भाजताना थोडी काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून पराठे लाटताना  फुटणार नाहीत आणि तव्यावर भाजायला टाकले की बटर लावताच मस्त टम्म फुगून येतील. 

 

असा लाटावा स्टफ पराठा१. सगळ्यात आधी तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. ती म्हणजे जेव्हा आपण लाटायला घेणार असू, तेव्हाच पराठ्याचं स्टफिंग तयार करावं. पराठे लाटण्याचं पीठ आगोदर मळून ठेवा, पण स्टफिंग मात्र ऐनवेळीच बनवा. असं केल्याने स्टफिंगला पाणी सुटून ते सैलसर होणार नाही. 

२. पराठ्यासाठी जी कणिक भिजवणार असाल ती नेहमी पोळ्यांना जशी भिजवतो, त्यापेक्षा जरा घट्ट भिजवावी. कणिक सैल झाल्यास पराठा फुटू शकतो.

३. पराठ्यासाठी कणिक मळताना जेवढं गव्हाचं पीठ घेणार असाल, त्याच्या एक चतुर्थांश मैदा घ्या. पराठ्याच्या आवरणात जर थोडा मैदा टाकला तर पराठा लाटताना आणि भाजताना फुटत नाही. तसेच पराठा लाटतानाही त्याला मैदा लावा. 

 

४. पराठा अत्यंत हळूवार हाताने लाटावा. मधल्या भागापासून लाटणे सुरू करावे आणि मग गोलाकार फिरवत काठांकडे सरकवावे.

५. पराठ्यासाठी आधी जी छोटी पोळी लाटतो, ती फार मोठी करू नये. यामुळे मधल्या भागात पराठा फुटतो. एका मध्यम आकाराच्या पुरीएवढीच पोळी लाटून घ्यावी आणि त्यात अगदी मधोमध स्टफिंग भरावे. ते स्टफिंग अगदी व्यवस्थित बंद होईल, याची काळजी घ्यावी.

६. स्टफिंग बनवताना त्यात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी. पीठ किंवा स्टफिंग सैलसर झाले की पराठे फुटतात.

७. दोन- तीन पराठे लाटणं झाले की प्रत्येकवेळी स्वच्छ आणि जाड कापडाने तवा पुसून घ्यावा. कधी कधी तवा जास्त तापला गेला की पराठा फुटतो किंवा जळतो.

 

टॅग्स :अन्नपाककृती