श्रावण महिना लागला की थेट दिवाळीपर्यंत सणवार सुरू असतात. मग अगदी पंधरा- पंधरा दिवसाला काहीतरी गोडधोड केलं जातं. देवाला नैवेद्य दाखवला जातो. बरं कितीही कंट्रोल केलं तरी गोड पदार्थ पाहून आपल्यालाच राहवत नाही. तोंडावरचा ताबा सुटतो आणि मग नको नको करत गोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारला जातो. त्यातही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची तर खूपच पंचाईत होते. म्हणूनच तर यावर्षी पारंपरिक पदार्थांना थोडा फाटा द्या आणि नव्या धाटणीचे कमी गोड असणारे पदार्थ करून पहा. असे कमी साखरेचे पदार्थ असतील, तर मोकळ्या आणि आनंदी मनाने गोड पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
१. नट्स बर्फी
साहित्य
एक कप काजू पावडर, अर्धा कप भाजलेल्या तिळाचा कुट, बारीक चिरलेले बदाम, पिस्ते, काजू प्रत्येकी दोन- दोन टेबलस्पून, पाऊण कप स्ट्रॉबेरी सिरप
कशी बनवायची नट्स बर्फी
- सगळ्यात आधी तर एका पॅनमध्ये तूप टाका आणि थोडे तापू द्या.
- त्यानंतर तुपामध्ये काजू पावडर, तीळाचा कुट आणि काप केलेले बदामाचे तुकडे टाका.
- या पदार्थांमधला ओलसरपणा जाईपर्यंत ते व्यवस्थित परतून घ्या. पण परतत असताना हे मिश्रण जळणार नाही, याची काळजी घ्या.
- आता त्याच्यात स्ट्राॅबेरी सिरप टाकावा आणि हे मिश्रण जरा घट्ट होईपर्यंत शिजू द्यावं.
- जरा घट्ट झालं की त्या डिशमध्ये बर्फी सेट करायला ठेवणार आहात, त्या डिशला थोडे तुप लावा आणि मग त्यावर मिश्रण टाकून व्यवस्थित पसरवून घ्या.
- त्यावर सजावट करण्यासाठी ड्रायफ्रुट्स किसून टाका आणि ३ ते ४ तास बर्फी सेट होऊ द्या.
- त्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्याचे उभे, चौकोनी काप करा आणि मस्त होममेड नट्स बर्फी सर्व्ह करा.
२. रताळ्याचं श्रीखंड
साहित्य
एक कप शिजवलेले रताळे, १ कप चक्का, ४ चमचे मध, कापलेले ड्रायफ्रुट्स, केशर
कसं बनवायचं रताळ्याचं श्रीखंड
- सगळ्यात आधी तर दह्यातलं पाणी काढून घ्या आणि ते श्रीखंडासाठी तयार करा.
- पाणी काढून टाकलेला चक्का आणि मध एका बाऊलमध्ये मिक्स करा.
- उकडलेल्या रताळ्याची सालं काढून टाका आणि रताळ्यांची चांगली पेस्ट बनवून घ्या.
- रताळ्याची पेस्ट चक्का आणि मधात टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
- या मिश्रणात कापलेले ड्रायफ्रुट्स आणि केशर टाकले की झाले रताळ्याचे श्रीखंड तयार.
- हे श्रीखंड एक तास तसेच ठेवा. त्याला थंड होऊन सेट होऊ द्या आणि नंतर सर्व्ह करा.
३. शुगर फ्री मोदक
साहित्य
४०० ग्रॅम बिया नसलेले खजूर, ५०० ग्रॅम बदाम, काजू, अक्रोड आणि खोबरं, दोन चमचे तूप.
कसे करायचे शुगर फ्री मोदक
- सगळ्यात आधी तर आपल्याकडच्या सगळ्या ड्रायफ्रुट्सचे छोटे काप करून घ्या.
- यानंतर बिया नसलेले खजूर व्यवस्थित स्मॅश करा. यामध्ये आता ड्रायफ्रुट्सचे काप आणि तूप टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
- खजूर आणि तूप यांच्यामुळे निर्माण झालेल्या ओलाव्यातच आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स भिजवायचे आहेत.
- हे सगळे मिश्रण व्यवस्थित मळून घेतले की त्याचे छोटे छोटे लाडू बांधून त्याला मोदकाचा आकार द्या.