दिवाळीचा फराळ संपत आला की बेसन, रवा, बुंदी, मोतिचूर या लाडवांचे डबे झराझर रिकामे होऊ लागतात आणि त्यांच्या जागेवर घरच्या साजूक तुपात तयार झालेले, खमंग आणि अतिपौष्टिक असे डिंकाचे, मेथ्यांचे, उडीदाचे लाडू येऊन बसतात. तुळशीचं लग्न होईपर्यंत घरोघरीचा फराळ संपत आलेला असतो. थंडीही वाढत चाललेली असते. त्यामुळे मग बहुतांश घरातल्या महिला आपले पारंपरिक डिंकाचे लाडू करण्याच्या तयारीला लागतात. खूप थंडी असणाऱ्या डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यात तर दररोज सकाळी उठलं की चहा पिऊन आधी डिंकाचा लाडू खायचा, असा अनेक घरांमधला जणू अलिखित नियमच असतो.
नोव्हेंबर महिना अर्धा उलटून गेला आहे. म्हणूनच तर तुमच्याही घरी आता डिंकाचे लाडू बनविण्याची तयारी सुरू झाली असणार. प्रत्यक्ष तयारी सुरू नसली झाली, तर किमान चर्चा तरी नक्कीच रंगली असेल. म्हणूनच तर ही एक छान रेसिपी फॉलो करा आणि डिंकाचे स्वादिष्ट लाडू तयार करा. लाडू करताना काही गोष्टी टाळल्या आणि काही गोष्टी आवर्जून केल्या तर नक्कीच लाडवाचे पौष्टिक गुण अधिक वाढतील यात शंका नाही.
हिवाळ्यात का खायचे डिंकाचे लाडू
- हिवाळ्याच्या थंडीत आपल्या शरीरात उर्जा टिकून रहावी, शरीराचे तापमान उबदार रहावे आणि बाहेरची थंडी आपल्याला बाधू नये, सर्दी, पडसे, शिंका, खोकला असे स्पेशली हिवाळी आजार आपल्याला होऊ नयेत, म्हणून हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ले पाहिजेत.
- हिवाळ्यात अनेक जणांना सांधेदुखीचा खूप त्रास होतो. किंवा ज्यांना याआधी कधी फ्रॅक्चर झालेले असते, ज्यांचे हाड मोडलेले असते, अशा लोकांना थंडीच्या दिवसात सांधे दुखण्याचा त्रास होतो. हिवाळ्यात जर डिंकाचे लाडू खाल्ले तर थंडी बाधत नाही, शरीर उबदार राहते आणि त्यामुळे सांधेदुखीचा त्रास जाणवत नाही.
- सिझेरियन झाले की अनेक महिलांना थंडीच्या दिवसात कंबरदुखीचा जरा जास्तच त्रास जाणवू लागतो. अशा महिलांनी डिंकाचे लाडू खाल्ल्यास कंबरदुखी कमी होते.
- पौष्टिक पदार्थांपासून डिंकाचा लाडू तयार होतो. त्यामुळे साहजिकच डिंकाचे लाडू खाल्ल्याने राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- अशक्त व्यक्तींना किंवा नुकत्याच मोठ्या आजारातून उठलेल्या व्यक्तींना दररोज एक मध्यम आकाराचा डिंकाचा लाडू खायला द्यावा. यामुळे अशक्तपणा कमी होतो आणि अंगात तरतरी येते.
- बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनाही डिंकाचा लाडू खाणे फायदेशीर ठरते. अशा व्यक्तींनी लाडू खाल्ल्यानंतर एक ग्लास गरम दूध प्यावे. अधिक चांगला परिणाम जाणवेल.
डिंक लाडू रेसिपी
लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य
पाव किलो डिंक, अर्धा किलो सुके खोबरे, अर्धा किलो खारीक, एक वाटी खसखस, पाव वाटी बादाम, एक किलो गूळ, अर्धी वाटी साजूक तूप.
कसे करायचे डिंक लाडू
- डिंकाचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी डिंक जाडसर कुटून घ्या. डिंकाची एकदम पेस्ट न करता तो थोडा जाडा- भरडा रवाळ ठेवावा.
- डिंकाला थोडे तूप लावावे आणि तो थोडावेळ तसाच ठेवावा.
- यानंतर खोबरे, खसखस भाजून घ्यावे. खोबऱ्याचा किस करून तो थोडासा भाजून घेतला तरी चालतो.
- खारका फोडून त्याची पूड करून घ्यावी आणि थोडे तूप टाकून भाजून घ्यावी.
photo credit- google
- बदामाचाही कुट करून घ्यावा.
- यानंतर कढईत गुळ टाकून त्याचा पक्का पाक करून घ्यावा. त्यात अर्धी वाटी तूप घालावे.
- त्यानंतर त्यात आधी डिंक टाकावा. डिंक व्यवस्थित हलवून घेतला की लाडूचे सगळे भाजून तयार असलेले साहित्य त्यात टाकावे.
- मिश्रण थोडं काेमट होत आलं की त्याचे मध्यम आकाराचे गोलाकार लाडू वळावेत.
- हे मिश्रण कोमट असतानाच त्याचे चांगले लाडू वळता येतात. त्यामुळे लाडू वळताना मिश्रण थंड होणार नाही, याची काळजी घ्या.
photo credit- google
या ५ टिप्स फॉलो करा
- डिंकाचे लाडू तयार करताना त्यात बिब्ब्याच्या बियाही टाकाव्या. या बिया आधी तुपात तळून त्याच्या लाह्या करून घ्याव्या आणि त्यानंतर ते तुपात टाकावे.
- कडवट चव असल्याने अनेक जण मेथ्यांचे लाडू खाणे टाळतात. त्यामुळे जर डिंकाचे लाडू बनवितानाच त्यात थोड्या मेथ्याही टाकाव्या. यामुळे डिंक, मेथ्या असे वेगवेगळे लाडू करण्याची गरज नाही. शिवाय डिंकाचा लाडू कडूही लागत नाही.
- डिंकाचे लाडू करताना त्यात थोडे उडीदही भाजून टाकावे. यामुळे लाडवाचे पौष्टिक गुणधर्म आणखी वाढतात.
- डिंकाचे लाडू करताना कधीच साखरेचा वापर करू नका. गुळातले लाडू बनवा.
- बदामासोबत तुम्ही काजू, अक्रोड, पिस्ते असे वेगवेगळे ड्रायफ्रुट्सही या लाडूत टाकू शकता.