Join us  

आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 1:57 PM

Aamla candy recipe without using gas: आवळा कॅण्डी बनविण्याची सोपी रेसिपी... गॅस न वापरताच तयार करा बाजारात मिळते तशी खुटखुटीत, रसरशीत आंबट- गोड आवळा कॅण्डी.

ठळक मुद्देआवळा अतिशय पाचक आहे. त्यामुळे पचनाचा त्रास कमी करण्यासाठी जेवणानंतर रोज एक आवळा कॅण्डी चघळावी.

बाजारात टपोरे आवळे (gooseberry)दिसू लागले आहेत. ते पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय... गोल गलगरीत, मोठाले आवळे पाहूनच आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचं लोणचं, आवळा कॅण्डी अशा वेगवेगळ्या पदार्थांची आठवण येऊ लागते... या वर्षीसाठी हे सगळे पदार्थ बनविण्याची तुमची तयारी झाली का सुरू? यंदा आवळा कॅण्डी बनविण्याची ही सगळ्यात सोपी रेसिपी ट्राय करून बघा.. रेसिपी अतिशय सोपी आहे. आवळा कॅण्डी बनविण्याच्या ज्या बऱ्याच रेसिपी आहेत, त्यामध्ये आवळे उकडावे, शिजवावे लागतात. पण ही जी वेगळी रेसिपी आहे, त्यामध्ये गॅसचा वापर आपल्याला अजिबातच करायचा नाही. आवळे न उकडता, न शिजवताही अगदी चटपटीत, झकास आवळा कॅण्डी तयार होते.. ही घ्या रेसिपी....

 

रेसिपी १गॅस न वापरता कशी करायची आवळा कॅण्डी- यासाठी एक किलो आवळे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घाला आणि ही पिशवी व्यवस्थित बंद करून ३ दिवसांसाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्या.- तीन दिवसांनी पिशवी बाहेर काढल्यानंतर आवळ्याचे सहज आपल्या हातानेच छान काप करता येतील. आवळ्याच्या बिया बाजूला काढून त्याचे एकसारखे काप करून घ्या.- यानंतर आवळ्याच्या फोडींमध्ये अर्धा किलो साखर टाका.- साखर आणि आवळे व्यवस्थित हलवून घ्या. या मिश्रणावर झाकण ठेवा आणि ते २४ तास तसेच राहू द्या.- यानंतर आवळ्याला पाणी सुटलेलं असेल. आता साखर मुरलेले आवळ्याचे तुकडे उन्हात वाळवायला ठेवा.- ३ ते ४ दिवसांनी आवळे वाळतील. यानंतर त्यामध्ये पुन्हा एक वाटी पिठी साखर, थोडी मिरेपूड आणि चवीनुसार काळं मीठ टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- गॅस न वापरता तुमची चटपटीत आवळा कॅण्डी झाली तयार...

 

रेसिपी २आवळे उकडून केलेली आवळा कॅण्डी - एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे आणि त्यात एक किलो स्वच्छ धुतलेले आवळे टाकावेत.- साधारण १० ते १२ मिनिटे आवळे उकळल्यानंतर ते एका चाळणीत टाका आणि पाणी वेगळे काढून घ्या.- आता चाकूने आवळ्याच्या फोडी करून बिया बाजूला काढून टाका.- आवळ्याचे तुकडे पुर्ण थंड झाले की त्यात ३ कप साखर टाका. - हे मिश्रण २ ते ३ दिवस तसेच राहू द्या. फक्त मधून मधून ते हलवत रहा. - यानंतर आवळे वेगळे काढून घ्या आणि ते उन्हात वाळवा.- आवळे वाळल्यानंतर त्याला पिठीसाखर चोळा आणि वाळवून हवाबंद डब्यात ठेवा.- पाण्याचा हात नाही लागला तर आवळा कॅण्डी अनेक महिने चांगली टिकते. 

 

आवळा कॅण्डी खाण्याचे फायदे - आवळा अतिशय पाचक आहे. त्यामुळे पचनाचा त्रास कमी करण्यासाठी जेवणानंतर रोज एक आवळा कॅण्डी चघळावी.- प्रवासात होणारा उलटी, मळमळ असा त्रास कमी करण्यासाठी आवळा कॅण्डी उपयुक्त ठरते.- आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (vitamin c)मोठ्या प्रमाणात असते.- आवळे त्वचा आणि केसांसाठी अतिशय गुणकारी असतात.- डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठीही आवळे उपयुक्त ठरतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.केसांची काळजीत्वचेची काळजीआरोग्य