बाहेर कितीही वेगवेगळ्या ब्रॅण्डचे रेडिमेड तूप मिळाले, तरी घरच्या तुपाची सर काही त्या बाहेरच्या तूपाला येत नाही. घरच्या तुपाचा सुवासच इतका मोहक असतो, की तो येताच तूप खाण्याचे टेम्प्टेशनही अनेकांना होते. याशिवाय फॅट्सच्या बाबतीत बघायला गेलं तर घरचे तूप निश्चितच बाहेरच्या तुपापेक्षा अधिक पोषक असते. पण घरचे तूप छान रवाळ होत नाही, अशी तक्रार देखील अनेक जणी करतात. तुम्हालाही जर तूप तयार करताना काही अडथळे येत असतील आणि तुमचंही तूप चांगलं होत नसेल, तर या काही ट्रिक्स नक्की करून बघा.
कसं करायचं तूप?- घरी तूप तयार करायचं असेल, तर साधारण ८ दिवसांपासूनच त्याच्या तयारीला लागावं लागतं.- रोजचं दूध तापवल्यावर जी साय येते, ती साय रोजच्या रोज बाजूला एका भांड्यात जमा करत जा आणि ते भांडं फ्रिजमध्येच ठेवत जा.- तुमच्याकडची साय किती घट्ट असते, यावर ते भांडं किती दिवसात पूर्ण भरेल, हे अवलंबून आहे. - पण साधारण ८ दिवस फ्रिजमध्ये साय जमा करावी.
- त्यानंतर रात्री सायीचं भांडं बाहेर काढावं आणि त्यामध्ये दोन चमचे दही टाकावं. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं आणि विरझण्यासाठी संपूर्ण रात्र बाहेर ठेवावं.- सकाळी हे मिश्रण चांगलं विरझलं असेल आणि सायीचं दही तयार झालं असेल.- आता हे सायीचं दही आणखी मोठ्या भांड्यात घाला. जेवढं दही आहे, तेवढंच किंवा त्याच्या दिडपट पाणी त्यात टाका.- रवी किंवा इलेक्ट्रिक हॅण्ड मिक्सरने हे मिश्रण व्यवस्थित हलवा. जोपर्यंत लोणी आणि ताक वेगळं होणार नाही, तोपर्यंत हे मिश्रण फिरवत ठेवा.- आता लोणी एका पातेल्यात जमा करा आणि ते गॅसवर कढवायला ठेवा.
लोणी कढवताना या गोष्टी कराजर आपलं घरचं तूप छान रवाळ व्हावं असं वाटत असेल, तर या काही ट्रिक्स करून बघा.१. लोण्यात टाका मीठजेव्हा तुम्ही लोणी कढवायला ठेवाल, तेव्हा त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका. असे केल्याने तूप रवाळ आणि छान खमंग होते.
२. विड्याचं पानलोणी कढवायला ठेवलं की त्यामध्ये एक विड्याचं पान टाका. यामुळे देखील तूप रवाळ होते आणि त्याचा रंगही छान येतो.
३. पाणी शिंपडालोणी कढवायला ठेवलं पण त्याला व्यवस्थित कढ बसून त्याचं तूप झालं की नाही, हे अनेकींना समजत नाही. म्हणूनच लोणी कढलं आहे, असं वाटलं तर त्यात थोडं पाणी शिंपडून पहा. जर आतमध्ये चांगला तडतडण्याचा आवाज आला तर तूप तयार झालं आहे, असं समजावं. पाणी शिंपडल्यामुळेही लोणी रवाळ होते. जर खमंग तूप आवडत असेल, तर तूप थोडे आणखी कढू द्या आणि त्याचा रंग लालसर होऊ द्या. पांढरे शुभ्र तूप आवडत असल्यास गॅस लवकर बंद करा.