बऱ्याचदा कुणी पाहूणे जेवायला येणार असतील तर पराठा, पोळ्या किंवा पुऱ्या आणि वेगवेगळ्या भाज्या असा आपला बेत ठरून जातो. पण मग भाताचं काय करावं हे कळत नाही. साधा भात ठेवावा की आणखी काही करावं, असा नेहमीचा प्रश्न. मग सारखं सारखं जीरा राईस करणंही नको वाटतं. मसालेभात तर नेहमीच करतो त्यामुळे तो ही करावा वाटत नाही. इतर बेत चायनिज असल्याशिवाय फ्राईड राईस पण रंगत नाही. मग अशावेळी भाताचा काही वेगळा प्रकार करावा वाटत असेल तर चटपटीत पनीर तवा पुलाव नक्की करून बघा. अतिशय झटपट होणारा हा पनीर तवा पुलाव नक्कीच सगळ्यांना आवडणारा तर आहेच, पण करायलाही अत्यंत सोपा आहे.
पनीर तवा पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य
पनीर, शिजवलेला भात, तेल, कांदा, गाजर, मटार, अद्रक- लसूण पेस्ट, तिखट, मीठ, बटर, हिरव्या मिरच्या, चाटमसाला, टोमॅटो, गरम मसाला
कसा करायचा पनीर तवा पुलाव
- सगळ्यात आधी तर आपण पुलाव करण्यासाठी जसा तांदूळ शिजवून घेतो, तसे तांदूळ शिजवा आणि मोकळा भात करून घ्या.
- यानंतर एका कढई किंवा पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून बटर टाका.
- बटर आणि तेल चांगले गरम झाल्यावर त्यात कांदा टाकून तो परतून घ्या.
- कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक- लसूण पेस्ट टाका.
- यानंतर बारीक चिरलेले गाजर, मटार टाका आणि परतून घ्या.
- भाज्या परतून झाल्या की बारीक चिरलेला टोमॅटो टाका आणि परतून घ्या.
- या भाज्यांमध्ये आता थोडे तिखट, थोडा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका आणि हलवून घ्या.
- भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये चौकोनी आकारात एकसारखे कापलेले पनीर टाका.
- पनीर आणि भाज्या व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.
- आता त्यामध्ये शिजवलेला भात टाका.
- भात टाकल्यानंतर पुन्हा थोडेसे मीठ, तिखट आणि गरम मसाला टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
- सगळ्यात शेवटी भातावरून पुन्हा थोडे बटर टाका आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि सगळे मिश्रण हलवून हलकी वाफ येऊ द्या.
- चांगली वाफ आली की गरमागरम तवा पनीर पुलाव सर्व्ह करा.