street food आजवर तुम्ही अनेक रेसिपी तयार केल्या असतील, पण अशी ही भन्नाट रेसिपी ना कधी ऐकली असणार ना कधी पाहिली असणार. त्यामुळे अशा प्रकाराने बनविलेला टोमॅटो चाट खाणे ही तर खूपच दूरची गोष्ट. टोमॅटो चाटचा हा अजब प्रकार सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल social viral होत आहे. अवघ्या काही दिवसात या व्हिडियोने लाखो लाईक्स मिळवले आहेत. आता सोशल मिडिया म्हणजे तिथे वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा होणारचं. अशीच चर्चा सध्या या व्हिडियोबाबतही रंगत आहे. कुणाला टोमॅटो चाट बनविण्याचा हा प्रकार अजिबात आवडलेला नाही, तर कुणी या रेसिपीवर आणि टोमॅटो चाटच्या टेस्टवर भलतेच फिदा झाले आहेत.
chatore_broothers या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडियो काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. दिल्ली ईस्ट ( Delhi East) येथील चित्रा विहार परिसरातील हा व्हिडियो आहे, असे सांगण्यात आले आहे. या व्हिडियोमध्ये असे दिसते की रस्त्यावर एक छोटीशी गाडी लावून तेथे एक तरूण मुलगा हा टोमॅटो चाट बनवत आहे. हा चाट बनविण्याची पद्धत अतिशय हटके आहे. टोमॅटो चाट बनविण्यासाठी या मुलाने सगळ्यात आधी तर एक मोठी कढई तापायला ठेवली आहे. या मोठ्या कढईमध्ये भरपूर वाळू टाकण्यात आली आहे. वाळू खूप तापल्यावर या मुलाने त्यामध्ये चांगले १० ते १२ टोमॅटो टाकले आणि चांगले घोळून घेतले. थोडक्यात सांगायचं तर त्या मुलाने या वाळूचा उपयोग टोमॅटो रोस्ट करण्यासाठी केला.
टोमॅटो रोस्ट झाल्यानंतर त्याने ते सगळे टोमॅटो बाजूला घेतले. एका बादलीमध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्यात हे सगळे वाळूत रोस्ट केलेले टोमॅटो टाकून धुवून घेतले. व्हिडियोमध्ये तरी टोमॅटो धुण्यासाठी या मुलाने मिनरल वॉटरल वापरल्याचं दिसत होतं. यानंतर त्याने धुतलेल्या टोमॅटोपैकी एक टोमॅटो घेतला. तयाचे उभे चार ते पाच काप केले. त्यावर त्याने कोणते तरी मसाले भुरभुरले. यापैकी एक मीठ असावे, असा अंदाज त्याच्या रंगावरून येतो. त्यानंतर त्याने त्याच्यावर चॉकलेटी रंगाची दिसणारी एक चटणी टाकली आणि अशा प्रकारे बनविलेला टोमॅटो चाट समोरच्या ग्राहकांना खायला दिला.
असा हा अजब गजब प्रकारे बनविलेला टोमॅटो चाट आरोग्यासाठी कितपत चांगला आणि सुरक्षित आहे... अशा प्रकारच्या कमेंट या व्हिडियोला आल्या आहेत. ज्यांनी हा पदार्थ चाखून पाहिला आहे, ते या चाटचे दिवाने झाले असून याची चव सुपर्ब यम्मी असल्याचे त्यांचे मत आहे. तर काही जणांना हा प्रकार आरोग्यासाठी अजिबातच सुरक्षित वाटत नाहीये. आपण जेव्हा दिल्लीला जाऊ तेव्हा हा पदार्थ नक्कीच चाखून पाहू. पण सध्या तरी हा व्हिडियो पाहूनच आपल्याला समाधान मानावे लागणार हे नक्की. त्यामुळे खाण्यासाठी सुरक्षित की असुरक्षित हा विचार सध्यापुरता सोडून द्या आणि किती वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनविली जात आहे, ते बघण्याचा आनंद घ्या.