आपल्या सगळ्यांनाच कधीतरी गोड खाण्याची इच्छा होते. काहीजण डाएटवर असूनही आठवड्यातून एकदातरी मन भरून गोड खातातच. सकाळच्या नाश्त्यासाठी अनेकांकडे ब्रेड आणला जातो. ब्रेड हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ सहज कधीही, कुठेही मिळतो. काहीजण चहासोबत ब्रेड खातात. तर काहीजण ब्रेडपॅटिस, सॅण्डविच, पिज्जा, उपमा तयार करण्यासाठी ब्रेड वापरतात. याच मऊ, पांढऱ्या ब्रेडपासून तुम्ही स्वादिष्ट गुलामजामही बनवू शकता. ब्रेड गुलाब जाम (Bread gulab jamun recipe) हे बनवायला सोपे असून झटपट तयार होतात.
गुलाबजाम हा भारतीयांच्या आवडत्या मिठायांपैकी एक पदार्थ आहे. नैवेद्यासाठी, उपवासाच्या दिवशी तुम्ही खीर, शिरा बनवून कंटाळला असाल तर हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा. ब्रेड गुलाबजाम तयार करण्याठी तुम्हाला लांबलचक साहित्य लागेल असंही नाही. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही हे गुलाबजाम बनवू शकता.
हे गुलाबजाम घरी बनवलेले आहेत की बाहेरून आणलेले आहेत हेच लक्षात येणार नाही. तुमच्या आवडीनुसार थंड किंवा गरमागरम सर्व्ह करू शकता. ब्रेड गुलाब जाम ब्रेडचे तुकडे आणि क्रीमयुक्त पीठापासून बनवले जातात. वेलचीपूड घातलेल्या सुंगधी साखरेच्या पाकात घोळवून या गुलामजामचा तुम्ही आनंद घेऊ शकता. ही घ्या ब्रेड गुलामजामची सोपी रेसेपी.
साहित्य
२ वाट्या साखर
१ टी स्पून वेलचीपूड
२ मोठे ग्लास पाणी
८ ते १० ब्रेड स्लाईस
१ कप दूध
८ ते १० काजू तुकडे
केशर, तूप गुलाबजाम तळण्यासाठी
कृती
१) सगळ्यात आधी साखरेचा पाक तयार करण्यसाठी -एका भांड्यात साखर व पाणी एकत्र करून माध्यम आचेवर पाक बनवायला ठेवा. पाक बनवायला १० मिनिट लागतील.
२) पाक फार पातळ किंवा फार घट्ट असू नये. पाकाला थोडासा चिकटपणा येऊ द्यावा. नंतर त्यात वेलची पूड, केशर घालून एकदा ढवळून घ्या मग भांडं झाकून ठेवा.
३) गुलाबजाम बनवण्यासाठी आधी ब्रेडच्या चारी बाजूंनी कडा कापून बाजूला ठेवा. ब्रेडच्या कडा एका पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. तुम्हाला कटलेट किंवा पॅटिस बनवताना वापरता येतील.
४) एका बाउलमध्ये ब्रेडचे तुकडे करून त्याचा चुरा करून घ्या. मग त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपण जसे पीठ मळतो तसे मळा. पीठ फार घट्ट किंवा सैल मळू नका. मग झाकून 5 मिनिट बाजूला ठेवा.
५) मळलेल्या पीठाचे चांगले गोळे तयार करा. गोळा तयार झाल्यानंतर हवा असल्यास त्यात काजू घालून पुन्हा गोळा घट्ट बंद करा.
६) कढईमध्ये तूप गरम करून घ्या. मग गोळे छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. साखरेचा पाक बनवलेल्या भांड्यात तळलेले गुलाबजाम घालून झाकण ठेवून मंद विस्तवावर 5 मिनिट गरम करून घ्या. थंड झाल्यावर बाउलमध्ये काढून घेऊन त्यावर आवडीनुसार बदाम, पिस्ता घाला. तयार आहेत स्वादिष्ट ब्रेड गुलामजाम