Join us

Food Tips: आहारतज्ज्ञ सांगतात, 'पीठ फार काळ वापरणे चांगले नाही'; जाणून घ्या पिठाची कालमर्यादा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 14:02 IST

Food Tips: पीठ आणि मीठ स्वयंपाकाचा अविभाज्य भाग आहे, पण ते किती काळ वापरावे, कसे साठवावे आणि वाया गेले तर पुनर्वापरात कसे आणावे ते पाहू. 

वाणसामानात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे घेतलेच जातात. नोकरदार महिला धान्य न घेता दळलेले पीठ विकत आणतात. त्यामुळे घरात रोज लागणाऱ्या पोळ्या, पराठे, भाकऱ्यांसाठी किलोवारी पीठ आणले जाते. ते रोजच्या वापरात असले तरी नेमके किती काळ वापरायचे, याला मर्यादा असते. त्यामुळे आणताना किती पीठ विकत घ्यावे आणि किती दिवसांसाठी साठवावे ते जाणून घेऊ. 

कोणत्याही प्रकारचे पीठ जास्त काळ साठवून ठेवल्यास खराब होऊ शकते. बहुतेक घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिठांना योग्य काळजी घेऊन साठवल्यास ६ महिने ते १ वर्षभरापर्यंतचा साठवणुकीचा कालावधी असतो. त्याउपर ठेवलेले पीठ वापरू नये, असे आहार तज्ज्ञ सांगतात. 

पॅकबंद घेतलेल्या पिठांवर प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्यांची मर्यादा त्या पॅकवर छापून दिलेली असते. असे पीठ वेळमर्यादा संपल्यानंतर वापरणे शरीराला अपायकारक ठरू शकते. 

गव्हाचे पीठ-

गव्हाचे पीठ पौष्टिकतेने परिपूर्ण असते. मात्र ते योग्य प्रकारे ठेवले नाही तर लवकर खराब होऊ शकते. याचे कारण म्हणजे त्यात असलेले नैसर्गिक तेल. हे तेल कालांतराने ऑक्सिडाइझ होऊ लागते, ज्यामुळे पिठाची चव आणि गुणवत्ता खराब होऊ शकते. सामान्यतः गव्हाचे पीठ साधारण तापमानात एक ते तीन महिने टिकते. फ्रिजमध्ये ठेवल्यास ते ६ महिन्यांपर्यंत ताजे राहू शकते. फ्रीजरमध्ये ठेवल्यास, त्याचे शेल्फ लाइफ १ वर्षापर्यंत वाढू शकते. परदेशात राहणारे लोक भारतातून खाद्यपदार्थ नेतात तेव्हा अशा पद्धतीने दीर्घकाळ साठवणूक करतात. 

मैदा -

मैदा हा गव्हाच्या पिठापेक्षा जास्त प्रक्रिया केलेला असतो त्यामुळे जास्त काळ टिकतो. रूम टेम्परेचरलाही तो ६-८ महिने टिकतो. फ्रिज मध्ये ठेवल्यास वर्षभर तो छान राहतो. मात्र वर्षभर बाहेर ठेवल्यास त्याला कीड लागून जाळी लागण्यास सुरुवात होते आणि गुणवत्ताही जाते. बाजरी तसेच मक्याच्या पिठांमध्येही नैसर्गिक तेल असल्यामुळे ती पिठं लवकर खराब होऊ लागतात. त्यामुळे ते आणतानाही कमी प्रमाणात आणावे आणि फार तर १-२ महिने वापरावे. 

पीठ खराब झाले कसे ओळखायचे?

जर पिठाला विचित्र वास येत असेल तर ते खराब झाले आहे असे समजावे. खराब पिठाचा रंग बदलतो.  ते पिवळे किंवा तपकिरी दिसू लागते. पिठात छोटे किडे किंवा धुळीसारखे कण दिसले तर लगेच फेकून द्या. खराब झालेले पीठ कडू किंवा विचित्र चवीचे असू शकते.

पीठ सुरक्षित ठेवण्याचे उपाय-

-पीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा, जेणेकरून आर्द्रता आणि हवा आत जाऊ शकणार नाही.-पीठ थंड आणि कोरड्या जागी ठेवा. सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवा.- जर पीठ जास्त काळ साठवायचे असेल तर ते रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजरमध्ये ठेवा.- तुम्ही पीठ विकत घेतले किंवा दळून घेतले तर त्या पिशवीवर किंवा नोंद वहीवर तारीख लिहा,  जेणेकरून ते किती कालावधीत संपवायचे ते तुमच्या लक्षात येईल. - शक्यतो पिठाचा साठा न करता लागेल तेवढेच पीठ आणणे केव्हाही चांगले. 

पीठ फेकणे जीवावर येते? वाचा उपाय -

जर पीठ खाण्यास अयोग्य झाले असेल तर ते फेकून देण्याऐवजी बागेत खत म्हणून वापरा. पिठाचा वापर करून मुलांसाठी चिकणमाती किंवा इतर हस्तकलेच्या वस्तू बनवा. तेलकट भांडी घासण्यासाठीही त्या पिठाचा वापर करता येईल!

टॅग्स :अन्नअन्नातून विषबाधा