Join us

मोड आलेले बटाटे शरीरासाठी ठरू शकतात विष; तोटे समजल्यावर राहाल चार हात लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:18 IST

बऱ्याचदा घरी ठेवलेल्या बटाट्यांना मोड येतात. काही जण तेवढा भाग कापून तो बटाटा वापरतात तर काही जण पूर्ण बटाटा फेकून देतात.

बटाट्याची भाजी खायला अनेकांना प्रचंड आवडतं. ही आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मात्र बऱ्याचदा घरी ठेवलेल्या बटाट्यांना मोड येतात. काही जण तेवढा भाग कापून तो बटाटा वापरतात तर काही जण पूर्ण बटाटा फेकून देतात. अशा परिस्थितीत मोड आलेले बटाटे खरोखरच हानिकारक आहेत का?, ते शरीरासाठी विष ठरू शकतात का?, फायदा होतो की तोटा? असे अनेक प्रश्न पडतात. 

मोड आलेले बटाटे शरीरासाठी घातक

जेव्हा बटाट्यांना मोड येतात तेव्हा त्यात सोलानिन आणि चाकोनिन नावाचे विषारी घटक तयार होऊ लागतात. हे ग्लायकोआल्कलॉइड नावाचे विषारी घटक आहेत. त्यामुळ मोड आलेल्या बटाट्यांचा जास्त वापर केल्यास ते अन्न विषारी बनू शकतं.

बटाट्यांमध्ये सोलानिन कसं तयार होतं?

जेव्हा बटाटे जास्त काळ ओलावा किंवा प्रकाशात ठेवले जातात तेव्हा त्यांच्यातील सोलानाइनची पातळी वाढते. बटाट्याची साल हिरवी होणं आणि मो़ड येणं हे त्यात विषारी पदार्थ तयार होऊ लागले आहेत याचं लक्षण आहे. जर मोड आलेले बटाटे जास्त प्रमाणात खाल्ले तर फूड पॉयझनिंग किंवा न्यूरोलॉजिकल समस्या होऊ शकतात.

मोड आलेले बटाटे खाण्याचे तोटे

- मोड आलेले बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.

- सोलानिन मेंदूवर परिणाम करतं, ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं आणि थकवा येऊ शकतो.

- सोलानिनचे जास्त प्रमाण ब्लड प्रेशरवर परिणाम करू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा आणि आळस येऊ शकतो.

- जर मोड आलेले बटाटे जास्त प्रमाणात खाल्ले तर ते नसा सुन्न करू शकतात म्हणजेच मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे शरीरात सुस्ती आणि मुंग्या येणं असं होऊ शकतं.

- गरोदरपणात मोड आलेले बटाटे खाल्ल्याने बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.

थोडेसे मोड असलेले बटाटे खाऊ शकतो का?

जर बटाट्याला खूप थोडेच मोड आले असतील आणि ते जास्त हिरवे झाले नसतील, तर ते वापरता येतात. परंतु जर खूप मोड आले असतील तर असा बटाटा खाणं टाळा. 

टॅग्स :बटाटाकिचन टिप्सअन्नआरोग्यहेल्थ टिप्स