(Image Credit- Google , You tube)
रोज कितीही साधं जेवण बनवलं असेल तरी लोणचं आणि ठेचा ताटात असेल तर त्या जेवणाच आनंद काही वेगळाच असतो. तोंडी लावायलाल ठेचा असेल तर जेवण उत्तम होतं. विशेष म्हणजे ठेचा बनवायला फारसं सामान लागत नाही. फक्त मिरच्या, मीठ, शेंगदाणे किंवा इतर पदार्थ घालून तुम्ही चविष्ट, चवदार ठेवा बनवू शकता. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं ठेचा तयार केला जातो. तुम्हीसुद्धा जेवणाची चव वाढवणाऱ्या या ५ ठेचा (Thecha Recipe in marathi) रेसेपीज नक्की ट्राय करून पाहा.
१) टोमॅटोचा ठेचा
साहित्य
2 चमचे तेल, 1 चमचा जिरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 चिरलेले टोमॅटो, 6 ते 7 सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ
कृती
आधी ६ ते ७ सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात 10 मिनिट भिजून घ्या. नंतर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं टाका. जिरं तडतडल्यानंतर त्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या टाका. लसूण करपूस झाल्यानंतर त्यामध्ये 4 चिरलेले टोमॅटो, 6 ते 7 भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून टोमॅटो चागलं शिजून घ्या.
टोमॅटो चांगले शिजल्यानंतर गॅस बंद करा. तयार झालेले मिश्रण थंड करून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात वाटून घ्या. आता तयार केलेले टोमॅटोचा ठेचा एका बाउलमध्ये काढून घ्या. आता टोमॅटोचा ठेचा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
२) हिरव्या मिरचीचा ठेचा
साहित्य
१० ते १२ जाड हिरव्या मिरची , 1/2 कप शेंगदाणे, 1/2 कप लसूण , तेल गरजेनुसार, 1/4 चमचे जीरं, मीठ चवीनुसार.
कृती
सगळ्यात आधी हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण आणि शेंगदाणे घाला आणि नीट एकत्र करून भाजून घ्या हे मिश्रण थंड झाल्यावर खलबत्त्यात ठेचा. हवंतर तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता. तयार आहे मिरचीचा ठेचा. गरमागरम पिठलं भाकरी, कांद्यासह हा ठेचा तुम्ही खाऊ शकता.
३) लसूण ठेचा
साहित्य
4-5 हिरव्या मिरची, 8-10 लसूण पाकळ्या, 1 चमचा शेंगदाणे , थोडीशी कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, 1/2 चमचा लिंबाचा रस , 1 लहान चमचा तेल, मोहरी
कृती
आधी शेंगदाणे भाजा आणि नंतर थंड झाल्यावर याची सालं काढा. लसूण आणि मिरचीचे लहान लहान तुकडे करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, लसूण आणि मिरची घालून साधारण 2-3 मिनिटं भाजा. हे मिश्रण थंड होऊ द्या. एका मिक्सरमध्ये लसूण, मिरची, शेंगदाणे, थोडेसे मीठ चवीनुसार घालून वाटून घ्या. हे थोडे जाडसरच वाटा. यामध्ये पाणी घालू नका. मिक्सरमधून बाऊलमध्ये काढा आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. लसूण ठेचा तयार आहे.
४) लाल मिरचीचा ठेचा
साहित्य
9-10 भिजत घातलेल्या लाल मिरच्या, 1 वाटी खोबरे किस, १५ ते २० सोललेल्या लसूण पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरे,1 टेबलस्पून टॉमॅटो सॉस, चवीपुरतं मीठ, हिंग, 1/2 अर्ध्या लिंबाचा रस, गरजेपुरता तेल
कृती
सगळ्यात आधी लाल मिरच्या पाच ते सहा तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात. लाल मिरच्या मिक्सर मध्ये वाटून घ्याव्यात. नंतर या मिरच्यांमध्ये सुकं खोबरे, जिरं, मीठ, एक टेबलस्पून टोमॅटो सॉस, लसूण टाकावा आणि पुन्हा मिक्सर मधून फिरवून घ्यावा आणि मिश्रण एका भांड्यात काढावं. कढई गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर जिरे,मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यावी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात लिंबाचा रस घालू शकता.
५) बटाट्याचा ठेचा
साहित्य
५ ते ६ बटाटे, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, गरजेपुरता तेल.
कृती
सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढा आणि लसूण सोलून घ्या. नंतर बटाटे, मिरच्या, लसूण हे सगळे पदार्थ मिक्सरमधून किंवा खलबत्त्यात बारिक करून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून फोडणी तयार करून घ्या. वरील मिश्रण चांगलं परतवून घ्या. चवीपूरता मीठ घाला. एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्या. तयार आहे बटाट्याचा ठेचा.