ड्राय फ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि प्रोटिन्स असतात. ड्रायफ्रुट्सचा वापर खीर, पुलाव, लाडू तयार करण्यासाठी केला जातो. गणेशोत्सवात वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ तयार करण्यासाठी ड्रायफ्रुट्स तयार केले जातील. नैवेद्याचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी ड्रायफ्रुट्स घालताना काही गोष्टींची काळजी घ्या.
१) जेव्हाही तुम्हाला ड्राय फ्रुट्स वापरायचे असतील तेव्हा एक तास आधी ते फ्रिजमध्ये ठेवून द्या. थंड ड्रायफ्रुट्सना मऊपणा येतो त्यामुळे कापायला किंवा किसायला सोपं पडतं.
२) जर तुम्हाला बदामाची सालं काढून टाकायची असतील तर काही तास पाण्यात भिजवून ठेवा जेणेकरून सालं सहज निघण्यास मदत होईल.
३) गरम पाण्यात बदाम भिजवल्यास लवकर फुगतील आणि सालं काढणं सोपं होईल.
४) काजू तोडण्यासाठी तुम्ही त्याच्या वरच्या भागाला दाबा त्यानंतर काजूचे २ तुकडे लगेच होतील.
५) खीर तयार करताना सगळ्यात शेवटी मनुके घाला. आधी घाल्यास दूध फाटण्याचा धोका असतो.
भेसळयुक्त खवा असा ओळखा
कोणताही सण असला की, खव्याची मोठी मागणी असते. त्यामुळे याच दिवसात खवा आणि मिठाईंमध्ये भेसळ करुन विक्री केली जाते. अशात या फसवणूकीपासून तुमचा बचाव करण्यासाठी आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आम्ही भेसळयुक्त खवा कसा ओळखावा याच्या टिप्स देत आहोत.
१) खवा घेताना आधी थोडा अंगठ्याच्या नखावर रगडा आणि काही वेळाने चेक करा. जर खवा भेसळयुक्त नसेल तर त्याचा सुगंध बराच वेळ येत राहिल.
२) खवा शुद्ध आहे की, भेसळयुक्त हे चाखूनही तपासता येतं. त्यासाठी खवा खरेदी करताना आधी थोडा खाऊन बघा. चव जर जरा आंबट किंवा वेगळी लागली तर त्यात भेसळ झाली आहे हे समजा.
३) थोडा खवा घेऊन त्याची गोल गोळी तयार करा. जर या गोळीला भेगा पडल्या तर समजा की, यात भेसळ झाली आहे. इतकेच नाही तर खवा हातात घेतांना त्यात चिकटपणा लागत नसेल तर यात भेसळ झाली आहे हे समजा.
४) खवा तपासण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे एका भांड्यात थोडं पाणी टाका आणि ते गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्यात टिंचर आयोडीनचे काही थेंब टाकावे. जर खव्याचा रंग बदलला तर त्यात भेसळ झाल्याचं समजा. जर तसं नाही झालं तर खवा शुद्ध आणि चांगला आहे.
५) खव्यामध्ये भेसळ करण्यासाठी सिंथेटिक दुधाचा वापर केला जातो. भेसळयुक्त खवा खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर अशुद्ध खव्याचं सेवन केल्याने लिव्हरवर सूज आणि आतड्यांना संक्रमण होण्याचाही धोका असतो.