थंडी पडू लागली की वेगवेगळे सूप, गरमागरम सार, मस्त अद्रक- सुंठ घातलेली कढी... असे सगळे पदार्थ गरमागरम प्यावेसे वाटतात. असाच एक थंडीत पिण्यासाठीची मस्त पदार्थ आहे बरं का... तो पदार्थ म्हणजे सुकामेवा आणि केशर घातलेले वाफाळते मसाला दूध. थंडी वाढू लागली की रात्रीच्या वेळी असे मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे. म्हणूनच तर औरंगाबाद (Aurangabad), पुणे (Pune)आणि इतरही काही शहरांमध्ये थंडीच्या दिवसांत अगदी चौकाचौकात गरमागरम मसाला दूध बनविणारे ठेले (masala milk stalls)दिसू लागतात.
कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या ठेल्यांना सुरूवात होते. काही ठेल्यांभोवती केले जाणारे डेकोरेशनही खूपच भारी असते. छान चार खांब टाकून छोटासा मंडप उभा केला जातो. वेगवेगळ्या झिरमिळ्या लावून तो मंडप सजवला जातो. मंडपात मग मध्यभागी मोठी शेगडी आणि त्यावर भल्या मोठ्या काळ्या कढईत उकळत असणारे मसालेदार दूध. १५ रूपयाला अर्धा ग्लास तर २० रूपयात ग्लासभर दूध मिळते. असं झकास वाफाळणारं दूध आपल्या घरीच मिळालं तर क्या बात.... म्हणूनच तर ही रेसिपी बघा आणि मसाला दूध घरच्याघरी तयार करा... खाली सांगितलेल्या मधुराज रेसिपीमध्ये दूध मसाला कसा तयार करायचा, याची सोपी पद्धत सांगितली आहे...
थंडी स्पेशल मसाला दुध करण्याची पद्धत
How to make masala milk for winter
- मसाला दूध बनविण्यासाठी दूध उकळायला ठेवा.
- दूध थोडे आटवले तर ते अधिक छान लागते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार दूध जेवढे पाहिजे तेवढे आटवून घ्या. पण खूप घट्ट रबडीप्रमाणे करू नका.
- उकळणारे दूध जर दोन कप असेल तर त्यात दोन चमचे साखर टाका.
- साखर टाकल्यानंतर दूध आणखी ८ ते १० मिनिटे उकळू द्या.
- दूध उकळत असताना दुधाचा मसाला तयार करून घेऊ.
- मसाला तयार करण्यासाठी ८ ते १० अख्खे बदाम, १० ते १२ पिस्ते, ३ ते ४ विलायची मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पूड तयार करुन घ्या. आता यामध्ये जायफळ किसून घाला. जायफळ साधारण पाव टिस्पून घ्या.
- जायफळाची पूड आपण तयार केलेल्या मसाल्यात टाका आणि पुन्हा सगळा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- दुधाला उकळी आली की त्यात मसाला घाला. केशराच्या काड्या थोड्या दूधात अर्धा तास भिजायला घाला आणि नंतर ते या पातेल्यात उकळणाऱ्या दुधात टाका. केशर टाकल्यानंतर काही वेळ दूध उकळू द्या. त्यामुळे केशराचा रंग आणि फ्लेवर दुधात छान मिसळला जाईल.
- आता थंडी स्पेशल असल्यामुळे हे दूध मस्त गरमागरमच पिऊन टाका.