Join us  

नाश्त्यासाठी करा फक्त 15 मिनिटांत 7 साऊथ इंडियन पदार्थ, झटपट चविष्ट नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 3:12 PM

पारंपरिक पध्दतीने साउथ इंडियन पदार्थ करताना तयारीला भरपूर वेळ लागतो. तयारीचा हा वेळ वाचवून इन्स्टंट कॅटेगरीत मोडणारे अनेक साउथ इंडियन पदार्थ करता येतात. इन्स्टंट इडली चटणी असू देत किंवा मेदू वडा... अवघ्या 15 मिनिटात 7 साउथ इंडियन पदार्थ करता येतात.

ठळक मुद्देपंधरा मिनिटात मेदू वडा करण्यासाठी पोहे आणि दही हे दोन घटक महत्त्वाचे  असतात. इन्स्टंट डोसा करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग करावा. मुरमुऱ्यांचे आप्पे झटपट होतात. 

सकाळी नाश्त्याला किंवा रविवारच्या दिवशी ब्रंचला साउथ इंडियन पदार्थ खाण्यास आवडतात. प्रकारांचं वैविध्य आणि प्रत्येक प्रकारच्या पदार्थाची विशिष्ट चव यामुळे साउथ इंडियन पदार्थ म्हटले की तोंडाला पाणी सुटतं. इडली सांबार, मेदू वडा, डोसे, उत्तपम , आप्पे हा प्रत्येक पदार्थ चवीला भन्नाट लागतो. सकाळी नाश्त्याला खा, दुपारच्या जेवणात खा किंवा ब्रंचचा मेन्यू ठेवला तरी हे पदार्थ खाऊन हमखास पोट भरतंच.

Image: Google

साउथ इंडियन  पदार्थ करायचे म्हटले तर त्याची तयारी आदल्या दिवशी करावी लागते. आठ ते दहा तासांची तयारी आणि मग साउथ इंडियन पदार्थांची हलकी फुलकी चविष्ट मेजवानी असा हा मामला असतो. हल्ली धावपळीच्या काळात पदार्थाच्या तयारीला इतका वेळ देणं अवघड होतं. मग असे पदार्थ घरी न करता बाहेर जाऊन, किंवा बाहेरुन आर्डर देऊन मागवले जातात.  पारंपरिक पध्दतीने साउथ इंडियन पदार्थ  करताना  तयारीला भरपूर वेळ लागतो. तयारीचा हा वेळ वाचवून  इन्स्टंट कॅटेगरीत मोडणारे अनेक साउथ इंडियन पदार्थ करता येतात.  इन्स्टंट इडली चटणी असू देत किंवा मेदू वडा... अवघ्या 15 मिनिटात 7 साउथ इंडियन पदार्थ करता येतात. 

Image: Google

इन्स्टंट इडली

इन्स्टंट इडली करण्यासाठी 2 कप रवा, 1 कप दही, चवीप्रमाणे मीठ, अर्धा कप बारीक चिरलेलं गाजर, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी,  तेल, 2 मोठे चमचे भिजवलेली हरभरा डाळ, 2 चमचे उडदाची डळ, हळद, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी. 

 इडली करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात रवा घ्यावा. त्यात दही घालावं. मीठ आणि  बारीक चिरलेलं गाजर घेऊन त एकजीव होईपर्यंत मिसळावं. मग छोट्या कढईत तेल गरम करावं. ते तापलं की त्यात मोहरी, जिरे घालावं. ते तडतडलं की त्यात कढीपत्ता, उडदाची डाळ, हरभरा डाळ घालावी. फोडणीत हे सर्व साहित्य नीट मिसळून घ्यावं. ही फोडणी रव्याच्या मिश्रणात घालून मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत हलवावं. मिश्रणाला पिवळा रंग चढला की नेहमी करतो तशा या मिश्रणाच्या इडल्या कराव्यात. चटणी आणि सांबारासोबत या इन्स्टंट इडलीचा आस्वाद घ्यावा. 

Image: Google

ग्रीन पीज उपमा

ग्रीन पीज उपमा करण्यासाठी 1 कप रवा, 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांडा, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टमाटा, अर्धा कप मटार, 3 कप गरम पाणी, 1 मोठा चमचा तूप, अर्धा चमचा तेल, मोहरी, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, अर्धा कप बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, सालीची उडदाची डाळ ( भिजवलेली), 1 चमचा हरभरा डाळ ( भिजवलेली) , अर्धा चमचा मिरे पूड, 2 चमचे लिंबाच रस, 1 चमचा किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घ्यावी. 

कढईत एक मोठा चमचा तूप गरम करावं. त्यात रवा घालून तो सोनेरी रंगावर परतावा. एका छोट्या पॅनमध्ये 3 कप पाणी गरम करावं. त्यात मटार घालून ते शिजवावेत. एका कढईत तेल तापवावं. त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की हरभरा  डाळ, उडीद डाळ घालावी. मिरची घालावी. कांदा, आलं, कढीपत्ता घालून 2-3 मिनिटं सर्व परतून घ्यावं. नंतर फोडणीत टमाटा घालावा. टमाटा परतला गेला की त्यात भाजलेला रवा , मीठ, मिरेपूड घालावी. सर्व चांगलं एकत्र करावं.  गॅसची  आच मंद करुन यात मटार आणि गरम पाणी घालावं. गुठळी राहाणार नाही अशा पध्दतीनं ते हलवावं. नंतर मंद आचेवर कढईवर झाकण ठेवून उपमा 5-7 मिनिटं शिजवावा. उपम्यातलं पाणी आटलं की तो नीट हलवून घ्यावा. गॅस बंद करण्याआधी त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालावं.

Image: Google

रवा अप्पम

रवा अप्पम करण्यासाठी अर्धा कप रवा, अर्धा कप पोहे, अर्धा कप दही, पाणी, अर्धा मोठा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा फ्रूट साॅल्ट घ्यावं. 

आधी एका भांड्यात रवा आणि पोह एकत्र करावेत. त्यात दही, पाणी, साखर, मीठ घालावं. सर्व नीट एकत्र करावं. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात फ्रूट साॅल्ट घालून ते वेगानं फेटावं. नाॅन स्टिक तवा गरम करुन गोल चमच्यानं मिश्रण तव्यावर घालावं. खालचा भाग तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. रवा अप्पम एकाच बाजूनेच भाजावं. खोबऱ्याची ओली चटणी आणि सांबारासोबत रवा अप्पम छान लागतो. 

Image: Google

तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा

तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा करताना 1 कप तांदळाचं पीठ, अडीच कप पाणी, मीठ, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मिरे पूड, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स, पाव कप चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा किसलेलं किंवा बारीक चिरलेलं आलं, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 मोठा चमचा कढीपत्ता, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर , 2 मोठे चमचे किसलेलं गाजर आणि डोसे शेकण्यासाठी तेल किंवा तूप घ्यावं. 

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात अडीच कप पाणी घालावं. त्यात एक कप तांदळाचं पीठ घालावं. मिक्सरमधून ते फिरवून घ्यावं. यापध्दतीनं पाण्यात पीठ चांगलं एकजीव होतं. गुठळी राहात नाही. तांदळाच्या पिठाचं हे मिश्रण एका भांड्यात  काढून त्यात कांदा, मिरची, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, गाजर, जिरे, मिरेपूड आणि मीठ घालून हे सर्व मिश्रण नीट हलवून घ्यावं. नाॅन स्टिक तवा गरम करुन त्याला थोडं तेल लावावं. त्यावर तांदळाच्या पिठाचं मिश्रण घालावं. हे मिश्रण पातळ असणं गरजेचं आहे. तव्यावर डोशाचं मिश्रण घातल्यावर त्यावर थोडं तेल घालून एक मिनिट झाकण ठेवावं. डोशाची खालची बाजू शेकली की डोसा काढून घ्यावा. हा डोसा एकाच बाजूने शेकायचा असतो. 

Image: Google

इन्स्टंट मेदू वडा

इन्स्टंट मेदू वडा करण्यासाठी 2 कप पोहे,  चवीनुसार मिरची, 1 मोठा चमचा किसलेलं आलं, कढीपत्ता, 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ, हिंग, 1 कप दही, जिरे, मीठ, तळणासाठी तेल  घ्यावं. 

मेदू वडे करण्यासाठी सर्वात आधी पोहे धुवून घ्यावेत. 4-5 मिनिटं ते पाण्यात भिजवावेत. पोहे नंतर गाळून घेऊन पाणी काढून टाकावं. भिजलेल्या पोह्यात दही , तांदळाचं पीठ, हिंग, जिरे, मीठ, आलं, कढीपत्ता घालून हे मिश्रण गोळा होईल या पध्दतीनं मळावं. गरज वाटल्यास आणखी थोडं दही घालावं. मिश्रणाचा मऊ गोळा मळून झाला की तेल तापवावं. हात ओले करुन वडे हातावर थापून मध्यभागी भोक पाडून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळावेत. यापध्दतीचे मेदू वडे अतिशय कुरकुरीत होतात. अशा पध्दतीने मेदू वडे केल्यास केवळ पंधरा मिनिटात वडे होतात. 

Image: Google

मुरमुरे आप्पे

मुरमुरे आप्पे करण्यासाठी 2 कप मुरमुरे, 1 कप रवा, अर्धा कप दही, अर्धा कप चिरलेला कांदा, पाव कप चिरलेला टमाटा, 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा बेकिंग सोडा , थोडा लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ घ्यावं. आधी मुरमुरे  पाण्यात 5 मिनिटं भिजत घालावेत. एका बाजूला रवाही पाण्यात भिजत घालावा.  10 मिनिटांनी भिजलेले मुरमुरे आणि रवा एकत्र करुन मिक्सरमधून वाटावं. हे मिश्रण एका भांड्यात काढावं.  त्यात कांदा, मिरची, टमाटा, लाल तिखट घालून मिश्रण चांगलं एकजीव करावं.  मिश्रण एकजीव केलं की सोडा आणि लिंबाचा रस घालून मिश्रण वेगानं फेटावं. आप्प्याच्या मिश्रणाला तेल गरम करुन मोहरी आणि हिंगाची फोडणी करुन घालावी. या मिश्रणाचे नेहमीप्रमाणे आप्पे करावेत. 

Image: Google

ओट्स उत्तपम1 कप ओट्स, अर्धा कप रवा, चिमूटभर हिंग, 1 कप दही, 1 चमचा जिरे, पाव चमचा लाल तिखट, चिमूटभर खाण्याचा सोडा, आवश्यकतेनुसार पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा, सिमला मिरची, अर्शा चमचा हिरवी मिरची, मीठ, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल तेल, पाऊण चमचा बारीक चिरलेलं आलं घ्यावं. 

सर्वात आधी मिक्सरमध्ये ओट्स  आणि रवा एकत्र करावा. हिंग घालून हे मिक्सरमधून वाटावं. एका भांड्यात हे  मिश्रण काढून त्यात दही, जिरे, तिखट, सोडा, आलं, पाणी घालून त्याचं दाटसर मिश्रण कराव्ं. हे मिश्रण दहा  मिनिटं बाजूला ठेवावं.  10 मिनिटांनी मिश्रणात कांदा, टमाटा, सिमला मिरची घालून चांगलं एकत्र करावं. नाॅन स्टिक तव्याला तेल लावून तवा गरम करावा. त्यावर ओटसचं मिश्रण घालून उत्तपम करावेत. नारळाची चटणी आणि सांबार यासोबत ओट्स उत्तपम चांगले लागतात. 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सआहार योजना