किचन सिंक चोकअप होवून किचनमध्ये पाणीच पाणी होणं, दुर्गंधी येणं, मेणचट घाण स्वच्छ करण्याची डोकेदुखी याचा सामना अनेकांना कायम करावा लागतो. कायम प्लंबरला बोलावून चोकअप सिंकची समस्या सोडवावी लागते. प्लंबरमुळे तुंबणाऱ्या सिंकची समस्या सुटत असली तरी सिंक चोकअप होणार नाही याची काळजी घेतली तर... छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास वारंवार सिंक तुंबण्याची डोकेदुखी दूर करता येते.
Image: Google
सिंक चोकअप होवू नये म्हणून..
1. सिंक ब्लाॅकेज होवू नये यासाठी ड्रेन स्ट्रेनचा उपयोग करावा. कोणत्याही हार्डवेअर दुकानात ड्रेन स्ट्रेनचे वेगवेगळे प्रकार मिळतात. सिंकच्या तोंडाशी हे ड्रेन स्ट्रेन लावल्यास सिंकमध्ये कचरा जाण्यापासून रोखता येतो.
Image: Google
2. तळून उरलेलं तेल सिंकमध्ये टाकून दिलं जात. तेल थंडं झालं की सिंकच्या पाइपमध्ये थिजतं. तिथे नंतर त्याचा घट्ट थर तयार होतो. सिंक चोकअप होण्यास तेल कारणीभूत ठरतं. हे टाळण्यासाठी सिंकमधे कधीही तेल टाकू नये.
3. चहाची भांडी धुताना चहा पावडर सिंकमध्येच टाकून देण्याच्या सवयीनं सिंक वारंवार चोकअप होतं. सिंकच्या पाईमध्ये चहाची पावडर अटकून बसते. ओलसरपणामुळे तिचा आकार फुगतो. त्यामुळे चहाच्या भांड्यातील चहा पावडर सिंकमध्ये न टाकता ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकावी किंवा झाडांना खत म्हणून वापरावी.
Image: Google
4. सिंक चोकअप होण्याची समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून एक वेळा सिंकमध्ये गरम पाणी घालावं. गरम पाण्यामुळे सिंकच्या पाइपमधील घाणीचे अडथळे दूर होतात. पाइपमध्ये ब्लाॅकेजेस धरत नाही. सिंकमध्ये गरम पाणी टाकताना ते एकदम न टाकता हळूहळू टाकावं. यामुळे पाइपमधील अडथळे दूर होण्यास मदत होते.
Image: Google
5. सिंकमध्ये भाज्यांची सालं, चहा-काॅफी पावडर, भाताची शितं, उरलेलं अन्न टाकू नये. सिंकमध्ये जेवणाची स्वयंपाकाची भांडी घासताना भांड्यामधील कचरा आधी काढून टाकावा.
Image: Google
6. सिंक वारंवार तुंबू नये यासाठी महिन्यातून सिंकचा पाईप फ्लश करावा. यासाठी स्वयंपाकघरातील बेकिंग सोड्याचा उपयोग करता येतो. यासाठी 3-4 मोठे चमचे बेकिंग सोडा सिंकमध्ये घालावा. 2-3 मिनिटानंतर हळू हळू गरम पाणी घालावं. बेकिंग सोडा आणि गरम पाण्यामुळे सिंकच्या पाइपमधे अडकलेली घाण फ्लश होवून पाइप स्वच्छ होतो. सिंक ब्लाॅकेजचा धोका टळतो.