थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या मुबलक प्रमाणात आणि चांगल्या दर्जाच्या उपलब्ध असतात. तसेच या भाज्या स्वस्त असल्याने आपण आहारात भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. थंडीत मटार आणि गाजर या तर वर्षभर अजिबात न दिसणाऱ्या भाज्या आवर्जून दिसतात. मग या काळात या भाज्या आहारात असाव्यात यासाठी आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करतोच. पण त्याशिवाय या भाज्यांपासून केलेले ताजे लोणचे ही या काळात केली जाणारी खास रेसिपी. हे लोणचं वरण-भात, पोळी, पराठा किंवा अगदी उपमा आणि पोहे यांच्यासोबतही फार छान लागते.
लोणचं असले तरी त्यासाठी फार काहीच जिन्नस लागत नाहीत. भाज्यांना असणारी नैसर्गिक चव आणि मीठ, तिखट, साखर, मोहरीची फोडणी या किमान गोष्टी वापरुनही हे लोणचं अतिशय चविष्ट लागते.जेवणाची रंगत वाढवणारे आणि अगदी झटपट होणारे हे लोणचे नक्की ट्राय करुन पाहा. हे ताजे लोणचे वर्षभरासाठी नाही पण महिन्याभरासाठी नक्कीच साठवता येऊ शकते. मात्र यासाठी भाज्या ताज्या आणि कोवळ्या असणे गरजेचे असते. पाहूयात हे ताज्या भाज्यांचं लोणचं नेमकं कसं करायचं (Fresh Vegetable Pickle Loncha winter special Recipe).
साहित्य -
१. फ्लॉवर - पाव किलो
२. मटार - अर्धा किलो
३. गाजर - पाव किलो
४. तेल - २ चमचे
५. मोहरी, हिंग, हळद - फोडणीपुरते
६. मीठ - १ चमचा
७. साखर किंवा गूळ - १ चमचा
८. तिखट - अर्धा चमचा
९. मोहरी पावडर - १ चमचा
कृती -
१. फ्लॉवर आणि गाजर या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या, मटार सोलून दाणे पाण्याने धुवून घ्या.
२. भाज्यांमध्ये मीठ, तिखट, गुळ किंवा साखर घालून ठेवा.
३. दुसरीकडे कढईत फोडणी करा आणि त्यात मोहरी घाला. ती तडतडली की हिंग आणि हळद घालून त्यात मोहरीची पूड घाला.
४. फोडणी चांगली झाली की गरमच भाज्यांच्या मिश्रणावर घाला.
५. हे सगळे मिश्रण एकजीव करा आणि जेवणासोबत खायला घ्या. या भाज्या कच्च्या असल्या तरी फोडणीमुळे त्यावर संस्कार होतात.
६. हे लोणचे थंडीच्या दिवसांत बाहेरही १५ दिवसांपर्यंत चांगले टिकते. त्यामुळे ताजे असतानाच तुम्ही हे लोणचे खाऊ शकता.
७. तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याशिवाय मिरची, लसूण, आलं, आवळा यांचे मोठे काप करुन तेही घालू शकता.