Join us  

फ्रिजमधला पसारा डोक्याला ताप; फ्रिज स्वच्छ  करायचा तर  6 सोप्या गोष्टी करा, फ्रिज चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 7:57 PM

फ्रिजच्या स्वच्छतेकडे पूर्णच दुर्लक्ष करतात. त्यामुळे फ्रिजच्या आतील भागात डाग पडतात, फ्रिजला नकोसा वास येवू लागतो. फ्रिजची स्वच्छता आपल्या आरोग्यासाठीही असते महत्त्वाची. 

ठळक मुद्देफ्रिज पुसण्यासाठी गरम पाणी घ्यावं.पिवळे डाग घालवण्यासाठी पाण्यात थोडी कपडे धुण्याची पावडर घालावी.फ्रिजमधील डाग आणि दुर्गंधी जाण्यासाठी लिंबाचा रसही उपयोगी ठरतो.

फ्रिज ही पूर्वी चैनीची वस्तू होती; पण आता स्वयंपाकघरातील ती अतावश्यक बाब झाली आहे. नुसता फ्रिज बिघडला तरी आता दुधाचं काय होणार? भाज्या कशी टिकतील यासारखे अनेक प्रश्न पडायला लागतात. पण अशा या अत्यावश्यक गोष्टीची काळजी आपण किती घेतो. फ्रिजची काळजी घेणं म्हणजे फ्रिज स्वच्छ ठेवणं. कारण फ्रिजमधे आपण खाद्यपदार्थ, खाण्याशी निगडित आवश्यक बाबी ठेवत असतो.

फ्रिजमधील अन्नपदार्थ चांगल्या स्थितीत राहाण्यासाठी फ्रिज स्वच्छ ठेवणं हे गॅस, ओटा, भांडी स्वच्छ ठेवण्या इतकंच महत्त्वाचं काम आहे. पण फिज स्वच्छ ठेवणं हे अनेकींना अवघड आणि वेळखाऊ काम वाटतं. अनेकजण तर वरेचवर फ्रीज पुसून मोकळे होतात तर काही फ्रिजच्या स्वच्छतेकडे पूर्णच दुर्लक्ष करतात. त्यामुळे फ्रिजच्या आतील भागात डाग पडतात, फ्रिजला नकोसा वास येवू लागतो. तसेच फ्रिजच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं म्हणजे फ्रिजमधील अन्नपदार्थ आणि इतर गोष्टींकडेही दुर्लक्ष होणं. अन्नपदार्थांकडे दुर्लक्ष झाल्यास ते खराब होतात आणि फ्रिज अस्वच्छ होण्याचं कारण ठरतात. अस्वच्छ फ्रिज हे देखील आपलं आरोग्य बिघडण्यास कारणं ठरतो. त्यामुळे फ्रिज स्वच्छ ठेवणं हे आवश्यक कामाच्या यादीत आधी घालायला हवं.

Image: Google

फ्रिज साफ करताना..

फ्रिज साफ करणं, फ्रिजला पडलेले डाग आणि दुर्गंधी घालवणं  हे अवघड काम नाही. काही सोप्या युक्त्या केल्यास फ्रिज पुसणं, स्वच्छ ठेवणं सोपं होतं.

1. फ्रिज पुसण्यासाठी आधी फ्रिज डिफ्रॉस्ट करावा. फ्रिजरमधला बर्फ विरघळला की मग फ्रिज पुसावा. फ्रिज पुसण्याआधी फ्रिजमधील सर्व सामान बाहेर काढावं आणि फ्रिज रिकामा करावा.

2. फ्रिजमधे पांढर्‍या भागावर जे पिवळे डाग पडतात ते साफ करणं अनेकांना अवघड वाटतं. पण ते साफ करण्यासाठी थोडं गरम पाणी घ्यावं. त्यात थोडं कपडे धुण्याची पावडर घालावी. या पाण्यानं संपूृर्ण फ्रिज नीट पुसून घ्यावा. या पाण्यात थोडं लिंबू पिळून घातलं तरी डाग लवकर जातात.

3. डाग जर फारच चिवट असतील तर किचनसाठी मिळणारं अँसिडचा उपयोग करावा. यासाठी एका न वापरणार्‍या टूथब्रशवर अँसिडचे काही थेंब घ्यावेत. हा ब्रश त्या पिवळ्य डागांवर हळुवार घासावा. नंतर पुन्हा साध्या पाण्यानं तो भाग पुसून घ्यावा.

Image: Google

4. फ्रिज पुसण्यासाठी एक प्रभावी द्रावण आपण घरच्याघरी तयार करु शकतो. यासाठी एक कप विनेगर घ्यावं. त्यात पाव कप बेकिंग सोडा घालावा. ते चांगलं एकत्र करुन मग याने फ्रिजचा आतील भाग पुसावा. डागही निघतात आणि फ्रिजला असलेली दुर्गंधीही निघून जाते.

5. फ्रिजमधील भाज्यांचा ट्रे धूवून घ्यावा. तो पूर्ण सुकल्यानंतरच त्यात भाज्या भराव्यात.

6. फ्रिज पुसून झाल्यावर थोडा वेळ सुरु करु नये. तसेच फ्रिजचं दारही थोड्या वेळ उघडं ठेवावं.