Join us  

गव्हाच्या भुशाची भाजी आता कोणी करत नसेलही,पण एकेकाळच्या गरीबीची चविष्ट आठवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 5:11 PM

Gahu Bhusa Bhaji Recipe : गरीबाचं पोट भरणारा कोंड्याचा मांडा असा हा पदार्थ, मात्र चव अशी अप्रतिम आणि पोषणही भरपूर!

शशीकला देवकर, पुणे

पुर्वीच्या काळी लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. प्रत्येक शेतकरी भाजीपाला पिकवू शकत नव्हता. कुठं दुष्काळ. तरी कुठं भाजीपालाच मिळत नसे.  त्यामुळे घरातील वाळवणाच्या पदार्थापासुन रोजच्या भाज्या बनवल्या जात असत त्यातीलच ही एक पारंपरिक पाककृती (Gahu Bhusa Bhaji Recipe).

गवारीची भाजी नेहमीचीच, ट्राय करा गवारीचा झणझणीत ठेचा; तोंडी लावायला गावरान रेसिपी... 

गव्हाच्या भुशाची भाजी

उन्हाळ्यात आपण कुरडया करण्यासाठी गहू भिजवून गव्हाचा चीक काढून घेतो व उरलेला चोथा फेकून देतो पण असे न करता त्यापासून भाजी किंवा वर्षभर टिकणाऱ्या अत्यंत चवदार अशा भुसवड्या तयार करता येतात. पूर्वी त्या सर्रास केल्या जात. भुशाची भाजी तर अत्यंत चविष्ट लागते. आता कुणी फार करत नसले तरी ही आठवणीतली भाजी अनेकांना आपलं लहानपण नक्की आठवून देईल.

साहित्य -

१. दोन वाट्या गव्हाचा ओला भुस्सा

२. दोन कांदे 

३. चार ते पाच लसणाच्या पाकळ्या

४. एक चमचा लाल तिखट

५. चवीपुरते मीठ

कृती-  १. प्रथम दोन कांदे चिरून घ्यावेत कढईत तेल टाकून हिंग जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यावी. 

२. नंतर लसूण ठेचून घालावा कांदा माध्यम आचेवर दोन मिनिटे परतून घ्यावा त्यात लाल तिखट मीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावे वरून भुसा घालावा. 

३. दोन मिनिट चांगले परतून त्यावर झाकण ठेवावे. मंद आचेवर तीन मिनिटे शिजवून गॅस घालवावा. 

४. भाजी चांगली एकजीव करावी गरम भाकरी व गरम भाजीबरोबर ताव मारावा सोबत भुसवडी भाजून घ्यावी.

टॅग्स :अन्नपाककृती 2023पाककृती