गणपती-गौरी म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण. हा सण घरोघरी, सोसायटीमध्ये, ऑफीसेसमध्ये आणि सार्वजनिकरित्याही अतिशय उत्साहात साजरा केला जातो. आपल्या घरच्या गणपतीच्या आणि गौरीच्या आरतीला आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी यांना आवर्जून बोलावतो. एकमेकांच्या गणपतीच्या आरतीला आणि दर्शनाला जाण्याची पद्धत असते. गणपती बाप्पाची आरती म्हणजे बाप्पाला प्रसाद दाखवण्याची आणि तो नैवेद्य म्हणून घेण्याची पद्धत असते (Ganpati Festival Prasad Options for Guest).
आरतीला किती लोक असणार हे माहित असले तर आपण त्याप्रमाणे नैवेद्याची सोय करतो. पण काही वेळा आपल्याकडे अचानकपणे आरतीला किंवा दर्शनाला लोक येतात. अशावेळी त्यांना प्रसाद म्हणून काय द्यायचे असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. बाप्पाचा प्रसाद म्हणजे शक्यतो गोड पदार्थ असावा अशी अपेक्षा असते. पण हल्ली अनेकांना गोड खायचे नसते. मग त्यातल्या त्यात हेल्दी आणि घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून झटपट करु शकतो असे पर्याय कोणते ते पाहूया...
१. गूळ-दाणे किंवा गूळ फुटाणे
सध्याच्या वातावरणात फुटाणे खाणे अतिशय फायदेशीर असते. यामुळे सर्दी खोकला तर जातोच पण आरोग्यासाठीही फुटाणे खाणे चांगले असते. दाण्यातूनही आपल्याला प्रोटीन्स आणि शरीरासाठी आवश्यक घटक मिळतात. गूळामध्ये लोह असल्याने आरोग्यासाठी गूळ चांगला असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ प्रसाद म्हणून आपण नक्कीच देऊ शकतो.
२. राजगिरा
राजगिरा हा अतिशय हेल्दी आणि कोणालाही चालणारा पदार्थ. गोड पेठे किंवा बर्फी देण्यापेक्षा राजगिरा पचायला हलका आणि आरोग्यदायी असतो. राजगिऱ्याच्या वड्या, लाडू, चिक्की असे काही घरात आधीपासूनच आणून ठेवल्यास ऐनवेळी होणारी तारांबळ टळते.
३. साखर-खोबरं
कोरडं खोबरं किंवा ओलं खोबरं आणि साखर आपल्या घरात साधारणपणे असतेच. हे दोन्ही एकत्र केल्यावर फार छान लागते. खोबऱ्यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असल्याने आपण प्रसाद म्हणून हा पर्याय नक्की देऊ शकतो. याचीच खिरापतही करुन ठेवण्याची पद्धत असते ती यासाठीच. यामध्ये खारीक पूड, मनुके, खसखस असते.
४. खजूर किंवा फळं
लोह असलेला आणखी एक चांगला पर्याय म्हणजे खजूर. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेला खजूर घरात असेल तर ऐनवेळी आपण प्रसादाला तो ठेवू शकतो. याशिवाय केळी, सफरचंद यांसारखी फळंही आपण प्रसादाला ठेवू शकतो.