गणेश चतुर्थी म्हणजे अनेकांचा उपवासाचा दिवस. गणपत्ती बाप्पाची मनोभावे आराधना करणारे भक्त या दिवशी आवर्जून उपवास करतात. गणपती बाप्पा प्रसन्न व्हावा आणि आपल्यावर त्याची कृपादृष्टी कायम राहावी अशी या भक्तांची भावना असते. मग सकाळी उठून बाप्पाची मनोभावे पूजा करणे, गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे आणि दिवसभर उपवास करणे असा दिनक्रम या दिवशी आवर्जून केला जातो (Ganesh Chaturthi Fasting Cooking Tips).
चतुर्थीचा उपवास सोडताना संध्याकाळी गणपतीची आरती करुन बाप्पाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. मग चंद्रोदयाची वेळ पाहून हा उपवास सोडला जातो. साधारणपणे चतुर्थी म्हटली की मोदक केले जातात. उकडीच्या मोदकांना थोडा वेळ लागतो. त्यापेक्षा तळणीचे मोदक झटपट होत असल्याने त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. त्यासोबत उपवास सोडायला काय मेन्यू करायचा असा प्रश्न पडला असेल तर चला पाहूया स्वयंपाकाच्या झटपट टिप्स...
१. एकीकडे पोळ्या किंवा पुऱ्या आणि मोदकांसाठी कणिक मळून घ्यायची.
२. त्यानंतर कुकरला भात, वरण आणि बटाटे लावा.
३. मग झटपट मोदकाचं सारण तयार करा. घरात ओलं खोबरं असेल तर ठिक नाहीतर कोरडं खोबरं किसून त्यामध्ये पिठीसाखर, खसखस, वेलची पूड आवडत असेल तर खारीक पूड आणि ड्रायफ्रूटचे तुकडेही घालू शकता.
४. मग उसळ किंवा रस्सा भाजीचे वाटण करुन एकीकडे ही भाजी फोडणीस टाकावी. वाटण आधीच तयार असेल आणि कडधान्य भिजवलेले असेल तर ही रस्सा भाजी झटपट होते.
५. तोपर्यंत कुकर झालेला असेल तर बटाटे आणि मटारची कोरडी डोसा भाजी करुन घ्यायची. बटाटा नको असेल तर फ्लॉवर, कोबी अशी घरात असेल ती कोणतीही भाजी करु शकता.
६. घरात सगळ्यांच्या आवडीप्रमाणे हिरवी चटणी किंवा कोशिंबीर या दोन्हीपैकी एक काहीतरी केले तरी चालेल. झटपट होईल अशीच एखादी कोशिंबीर किंवा चटणी करावी.
७. मोदकाचे सारण तयार झाल्यावर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यामध्ये हे सारण भरुन मोदत तळून घ्या. मोदक करायला वेळ लागेल असे वाटत असल्यास शेवयाची किंवा अगदी तांदळाची खीर करुन त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो.
८. पोळ्या किंवा पुऱ्या ऐनवेळी सगळे जेवायला बसल्यावर केले तरी चालेल. म्हणजे सगळ्यांना गरम खायला मिळतात.
९. पातळ भाजी असल्याने वरणाची आमटी नाही केली तरी चालते.
१०. हा मेन्यू झटपट होणारा असल्याने थोडी तयारी असेल तर अगदी तासाभरात तुमचा स्वयंपाक होऊ शकेल. त्यामुळे चतुर्थी असली तरी स्वयंपाकाचे टेन्शन घ्यायचे कारण नाही.