गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्याच घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते. बाप्पाच्या आवडीच्या दुर्वा, जास्वंद, पत्री या सगळ्याबरोबरच बाप्पाला आवडतात ते मोदकही आपण आवर्जून करतो. उकडीचे किंवा तळणीचे मोदक असतील तर ते आपण घरी करतो पण खव्याचे किंवा माव्याचे मोदक मात्र आपण बाहेरुन विकत आणतो (Ganesh Mahotsav Recipe). विकतचे मोदक एकतर महाग पडतात आणि पुरेही पडत नाहीत. तसंच हे मोदक किती ठेवलेले आहेत, यामध्ये किती प्रिझर्वेटीव्ह घातलेले आहेत, नक्की खवाच वापरला आहे की आणखी काही याबाबत आपल्याला माहिती नसते. अशावेळी आपण घरच्या घरीच खव्याचे मोदक तयार केले तर? झटपट होणारे आणि बाप्पासोबतच सगळ्यांना आवडणारे हे मोदक नक्की कसे करायचे पाहूया (Ganpati Special Khava Mava Modak)...
साहित्य -
१. खवा - पाव किलो
२. फूड कलर - १ चमचा
३. पिठीसाखर - २ ते ३ वाट्या
४. वेलची पूड - पाव चमचा
कृती -
१. गॅसवर मध्यम हिटवर पॅन ठेवा, पॅन चांगला तापू द्या.
२. यामध्ये खवा घालून तो डावाने हलवत राहा. खव्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅटस असल्याने त्यात तूप घालायची आवश्यकता नाही.
३. साधारणपणे १० ते १५ मिनीटे खवा चांगला गरम झाल्यानंतर तो मऊ होण्यास सुरुवात होते.
४. हा खवा थोडा कोरडा होईपर्यंत चांगला परतून घ्या, मात्र पूर्ण कोरडा होऊ देऊ नका.
५. खवा घट्टसर झाला की त्यामध्ये तुमच्या आवडीचा फूड कलर घाला.
६. गॅस बंद करुन खवा एका भांड्यात किंवा डीशमध्ये काढून घ्या आणि तो गार होण्यासाठी ५ मिनीटे फ्रिजमध्ये ठेवा.
७. खवा बाहेर काढून त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पिठीसाखर आणि वेलची पूड घाला.
८. हे मिश्रण हाताने आपण कणीक मळतो त्याप्रमाणे मळून घ्या.
९. मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर ते मोल्डमध्ये घालून त्याला मोदकाचा आकार द्या.
१०. शक्य असेल तर तुम्ही खवाही घरच्या घरी तयार करु शकता.