Join us  

गणपती बाप्पाच्या नैवेद्याला फक्त गोडच कशाला, करा तिखट-मीठाचे छान खमंग मोदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 1:05 PM

Ganesh Mahotsav Special Modak Recipe : झटपट होणारे आणि २ ते ३ दिवस छान टिकणारे हे तळणीचे मोदक कसे करायेच पाहूया...

ठळक मुद्देसतत गोड खायचा कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे.झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडतील असे हे वेगळे मोदक नक्की ट्राय करुन बघा

गणपती बाप्पाला प्रसाद म्हटलं की मोदकांशिवाय आपल्या डोळ्यासमोर दुसरं काहीच येत नाही. मोदकामध्ये उकडीचे, तळणीचे, खव्याचे, चॉकलेटचे आणि आणखी वेगवेगळे मोदक आपण या १० दिवसांत आवर्जून करतो. पण सतत गोड खाऊन एकतर कंटाळा येतो आणि डायबिटीस असेल तर गोड खाण्यावरही बंधने येतात. अशावेळी बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसादासाठी थोडं वेगळं काही करायचं असेल तर तिखट-मीठाचे खमंग मोदक करु शकतो. हे सारण करायलाही अगदी सोपं असून हे मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ले जातात. झटपट होणारे आणि २ ते ३ दिवस छान टिकणारे हे तळणीचे मोदक कसे करायेच पाहूया (Ganesh Mahotsav Special Modak Recipe)...

(Image : Google)

साहित्य -

१. सुकं खोबरं - १ वाटी 

२. दाण्याचा कूट - अर्धी वाटी

३. तीळ - पाव वाटी 

४. गोडा मसाला - १ चमचा 

५. धने-जीरे पूड - अर्धा चमचा 

६. लाल तिखट - अर्धा चमचा 

७. साखर - चवीपुरती

८. मीठ - चवीपुरते 

९. आमचूर पावडर - पाव चमचा 

१०. बेसन पीठ - अर्धी वाटी

११. गव्हाचे पीठ - २ वाट्या 

१२. तेल - १ वाटी 

 कृती -

१. खोबरं किसून चांगलं परतून घ्या. लालसर होत आलं की एका ताटलीत काढून ठेवा. 

२. याचप्रमाणे बेसन लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.

३. यामध्ये दाण्याचा कूट आणि तीळ घालून पुन्हा थोडे परतून घ्या आणि त्यात भाजलेले खोबरे घाला. 

४. गॅस बंद करुन या मिश्रणात आपल्या आवडीप्रमाणे गोडा मसाला, तिखट, धने-जीरे पावडर, आमचूर पावडर, चवीपुरते मीठ आणि साखर घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. 

५. हे मिश्रण गार होईपर्यंत मोदकांसाठी कणीक मळून घ्या. गव्हाचे पीठ, मीठ, तेल घालून घट्टसर कणीक मळा. (गणपतीच्या नैवेद्याला मीठ चालत नसेल तर मीठ घालू नका.)

६. तळणीच्या मोदकामध्ये आपण ज्याप्रमाणे सारण भरतो त्याचप्रमाणे पुऱ्या लाटून घेऊन त्यामध्ये हे सारण भरा आणि मोदक वळून घ्या.

७. कढईमध्ये तेल चांगले तापले की हे मोदक खरपूस रंगावर तळून घ्या.

८. हे मोदक २ ते ३ दिवस नक्की टिकत असल्याने आणि सतत गोड खायचा कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे. 

टॅग्स :गणेशोत्सवगणेशोत्सवगणपतीअन्नपाककृती