Join us  

गणपती विसर्जनाला वाटली डाळ तर हवीच, १० मिनीटांत करा बाप्पासाठी चविष्ट शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2022 2:47 PM

Ganpati Festival Visarjan Special Vatli Dal Recipe : डाळ परफेक्ट व्हावी यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

ठळक मुद्देआपण कैरीची डाळ करतो त्याचप्रमाणे ही डाळ असते फक्त कैरीऐवजी आपण यामध्ये लिंबाचा वापर करतो.  बाप्पाला निरोप देताना वाटली डाळ तर हवीच, पाहा सोपी रेसिपी...

गेले ५ ते ६ दिवस आपल्या घरी आलेला बाप्पा आज जाणार म्हटल्यावर घरोघरी काहीसं शांततेचं वातावरण असतं. गेल्या काही दिवसांत उत्साहात असलेल्या सगळ्यांना बाप्पाला निरोप देताना मात्र नको होते. असे असले तरी निरोप द्यावाच लागतो. इतके दिवस आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून गोडाधोडाचे काही ना काही करत असतो. मोदक खाऊन तर आपल्या बाप्पाचे पोट एव्हाना खूप मोठे झालेले असते. आता तो जायची वेळ येते तेव्हा मात्र त्याला खिरापत आणि वाटल्या डाळीचा नैवेद्य दाखवावा लागतो. आंबट-गोड चवीची ही डाळ आपण हा नैवेद्य आपण बाप्पाला निरोप दिल्यावर मग आपण प्रसाद म्हणून घेतो. आता ही डाळ परफेक्ट व्हावी यासाठी नेमकं काय करायचं पाहूया (Ganpati Festival Visarjan Special Vatli Dal Recipe)... 

(Image : Google)

साहित्य - 

१. हरभरा डाळ - २ वाट्या २. मिरच्या - २ ते ३ ३. लिंबाचा रस - १ चमचा ४. साखर - १ चमचा ५. मीठ - अर्धा चमचा ६. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी ७. फोडणीसाठी - तेल, मोहरी, जीरे, हिंग, हळद, कडीपत्ता

(Image : Google)

कृती -

१. हरभरा डाळ सकाळपासून पाण्यात भिजत घालायची. २. संध्याकाळी या डाळीमध्ये मिरची, मीठ आणि साखर घालून ती मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घ्यायची.३. एका मोठ्या बाऊलमध्ये डाळ काढून घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर घालून घ्यायचे.४. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी करायची. ५. ही गरमागरम फोडणी डाळीवर घालून डाळ हलवून एकजीव करुन घ्यायची. लिंबाचा रस आणि साखर यामुळे त्याला छान चव येते. आपण कैरीची डाळ करतो त्याचप्रमाणे ही डाळ असते फक्त कैरीऐवजी आपण यामध्ये लिंबाचा वापर करतो.  

 

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीगणपतीगणेशोत्सवअन्न