Join us  

गोड पदार्थासोबत करा मोदकाची झणझणीत आमटी, विदर्भ स्पेशल रेसिपी- चव अशी भारी की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 1:12 PM

Ganpati Mahotsav Vidarbha Special Recipe Modak Aamti : ऐन गणपतीतही पाहुणे जेवायला येणार असतील किंवा सतत गोड गोड होत असेल तर एक दिवस या आमटीचा बेत नक्की ट्राय करा.

ठळक मुद्देपोळी, भाकरी अशा कशासोबतही ही आमटी अतिशय चांगली लागते.  गणपतीत गोडासोबत झणझणीत काही हवं असेल तर ही मोदकाची आमटी हा उत्तम पर्याय आहे

गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांच्या आवडीच्या मोदकावर आपण ताव मारणार हे ओघानेच आले. बाप्पा आहेत तोपर्यंत गोडाधोडाचे जेवण आणि मज्जा-मस्ती. पण या गोडाच्या जेवणात मस्त झणझणीत मोदकाचीच आमटी असेल तर? आता मोदकाची आमटी कशी करतात असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल, तर आज आपण त्याचीच रेसिपी पाहणार आहोत. मराठवाड्यामध्ये एरवीही आवर्जून केली जाणारी ही मोदकाची अतिशय चविष्ट आमटी एकदा खाल्ली तर तुम्ही नेहमी खाल. मोदक असल्याने ऐन गणपतीतही पाहुणे जेवायला येणार असतील किंवा सतत गोड गोड होत असेल तर एक दिवस या आमटीचा बेत नक्की ट्राय करा. पाहा घरातले सगळे तर खूश होतीलच आणि तुम्हालाही तोंडाला मस्त चव येईल. चला तर पाहूया ही आमटी कशी करायची? (Ganpati Mahotsav Vidarbha Special Recipe Modak Aamti). 

(Image : Google)

साहित्य 

सारणाचे - 

१. खसखस - १ चमचा 

२. सुकं खोबरं - १ वाटी (बारीक किसलेले)

३. काळा मसाला - १  चमचा

४. तिखट - अर्धा चमचा 

५. मीठ - चवीनुसार 

६. धने-जीरे पावडर - अर्धा चमचा 

७. कोथिंबीर - अर्धी वाटी बारीक चिरलेली 

ग्रेव्हीचे 

१. कांदे - २ (उभा चिरलेला)

२. आलं - अर्धा इंच

३. लसूण पाकळ्या - ५ ते ६ 

४. सुकं खोबरं - २ चमचे (किसलेले)

५. तेल - २ चमचे

(Image : Google)

मोदकाच्या पाऱ्यांसाठी

१. बेसन - १.५ वाटी 

२. गव्हाचे पीठ - अर्धी वाटी 

३. मीठ - चवीनुसार 

४. हळद - पाव चमचा

५. तेल - १ चमचा 

कृती 

१. पॅनमध्ये खसखस आणि सुकं किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं. 

२. त्यामध्ये काळा मसाला, तिखट, धने-जीरे पावडर, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यायचे, हे सारण एका ताटात बाजूला काढून ठेवायचे. 

३. त्याच कढईत तेलात चिरलेले कांदे, लसणू पाकळ्या, आलं आणि सुकं खोबरं परतून घ्यायचे. 

४. गार झाल्यावर यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्सरवर बारीक ग्रेव्ही करायची. 

५. बोसन, गव्हाचं पीठ आणि मीठ, तेल, हळद घालून पोळ्यांसाठी कणीक मळतो त्याप्रमाणे घट्टसर कणीक मळायची. 

 

६. १० मिनीटे ही कणीत तशीच ठेवून त्याच्या पुऱ्या लाटायच्या आणि त्यामध्ये सारण भरुन मोदक करायचे. 

७. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचे आणि २ ते ३ मिनीटे चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये गोडा मसाला किंवा काळा मसाला आणि तिखट घालायचे.

८. सगळे एकत्र चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून चांगली उकळी काढायची. सारण थोडे पातळसर करायचे म्हणजे ते नंतर आळते. 

९. यामध्ये मोदक घालून आमटी १५ ते २० मिनीटे चांगली शिजू द्यायची, म्हणजे मोदक चांगले शिजतात. 

१०. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पोळी, भाकरी अशा कशासोबतही ही आमटी अतिशय चांगली लागते.  

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीगणपतीअन्नगणेशोत्सव