Join us  

माहेरवाशीण गौराईचे लाडकोड करण्यासाठी करा खास पदार्थ, सज्जीगे, गवसणीची पोळी आणि घारी मालपुवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 6:25 PM

गौराईच्या नैवेद्यात हे पारंपरिक खास, अन्य प्रांतीय पदार्थही करुन पहा. ही आगळी चव नक्की आवडेल.

ठळक मुद्देहे सर्व पदार्थ भारताच्या वेगवेगळ्या भागात देवाला/गौरीला अर्पण केले जातात,कोणी भोग म्हणते , कोणी नैवेद्य तर कोणी गौरीचे जेवण, पण भाव किंवा श्रद्धा मात्र तीच असते(सर्व छायाचित्र: गुगल)

शुभा प्रभू साटम

सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी काही वेगळे ,सोप्पे पदार्थ. नेहमीचा नैवैद्य आपण करतोच, पण हे जरा वेगळे पदार्थ. गौराईचे लाड करण्याचे, त्यांच्यासाठीचे खास भोजन. काही सोपे पण ‘खास’ पदार्थ.

सज्जीगे

हा कर्नाटकी प्रकार आहे,अननसाचा शिरासाहित्य:बारीक रवा १ वाटीछान पिकलेला अननस छोटे तुकडे करून अर्धी वाटीसाखर पाऊण ते अर्धा वाटीपाणी दीड वाटी वाटीआवडीने काजू ,वेलची,शक्यतो केशर नको.

कृती

तूप तापवून सुका मेवा परतून बाजूला करावा.त्यात हवं तर अधिक तूप घालून रवा मंद आगीवर सुरेख खमंग भाजून घ्यावा.बाजूला काढून, त्यात सुका मेवा मिसळून ठेवावा. पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे, त्यात अननस तुकडे घालुन उकळी आली की मंद आग करून ,रवा घालून, परतून साखर घालावी,व्यवस्थित ढवळून मंद आगीवर दणदणीत वाफ काढावी,शेवटी वेलची घालावी,वाटल्यास अननस इसेन्स घालू शकता, शेवटी घालावा.

चिरौंजी मखाना खीर (चारोळी मखाने खीर)

चारोळी १वाटी निवडून भिजत घालावी. खवट किंवा किडकी चारोळी काढून टाकावी.मखाने पाव वाटीखूप पिकलेली केळी २दाट घट्ट असे मलईदार दूध १लिटरसाखर थोडीशीमिल्क मेड अर्धी वाटीवेलची काजू बदाम

कृती

दूध आटवत ठेवावे,थोडे आटले की निवडलेली ,भिजवलेली चारोळी घालून मंद आगीवर ढवळत शिजवत राहावे, बाजूला दुसऱ्या भांड्यात तूप तापवून त्यात मखाने लालसर करून बाजूला ठेवावेत. त्यात सुका मेवा तळून घ्यावा.या तुपात थोडी साखर लालसर करून (कॅरॅमल करून)केळी त्यात छान लपेटून घेऊन बाजूला ठेवावी. आटत असलेल्या दुधात मिल्क मेड घालावे,गोडाचा अंदाज घेऊन साखर वाढवावी,नंतर मखाने,सुका मेवा, वेलची, केळी सर्व घालून,ढवळून गॅसवरून उतरवून ठेवावे.अत्यन्त चवदार अशी खीर तैयार.

पीठ पोळी/गवसणीची पोळी

कोकण आणि देशावरचा प्रकार,खीर,श्रीखंड,आमरस यासोबत देतातसाहित्य आणि कृतीमोदकाच्या उकडीप्रमाणे एक वाटी तांदूळ पिठीची मऊ उकड काढून नीट मळून घ्यावी.पाण्यात तूप /लोणी घातल्यास चव आणि पोत चांगला येतो.कणिक एक वाटी घेऊन त्यात मोहन घालून छान तिंबून घ्यावी. कणकेचा उंडा करून त्यात उकडीचा गोळा भरून,उंडा बंद करून मैद्यावर पातळ लाटून पोळीसारखी लालसर शेकवून घ्यावी.

घारी/कोळी पद्धतीचा मालपुवा

मैदा आणि बेसन एक वाटी,बेसन जरा भरड असल्यास उत्तम. यात पाऊण वाटी गूळ किसून मिसळावा,त्यात वेलची पूड घालून थोडथोडे पाणी घालून गूळ विरघळवून घ्यावा. पीठ भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्टसर हवे. तोपर्यंत तेल कडकडीत तापवून त्यात हे पीठ डावाने गोलसर ओतून खमंग लालसर असे तळून घ्यावे,वरून हवीतर भाजलेली खसखस पेरावी.वेगळा असा चवदार नैवेद्य.

हे सर्व पदार्थ भारताच्या वेगवेगळ्या भागात देवाला/गौरीला अर्पण केले जातात,कोणी भोग म्हणते , कोणी नैवेद्य तर कोणी गौरीचे जेवण, पण भाव किंवा श्रद्धा मात्र तीच असते. अशा श्रद्धेने घरोघरी पूजल्या जाणाऱ्या गौराईसाठी हा नैवेद्य फुलोरा. तुमच्या गौरी तृप्त होऊन खुशीने राहूदेत ही प्रार्थना.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)