गवार ही अनेकांच्या आवडीची भाजी. मग ही गवार वाटणातली असो नाहीतर नुसती परतून केलेली असो. गवारीची भाजी आणि भाकरी असेल की सोबत काहीच नसले तरी चालते. ग्रामीण भागात तर गवार अनेकांना आवडते. वातूळ असल्याने गवार जास्त खाऊ नये असे म्हटले जात असले तरी ही गवार कोवळी असेल तर त्याला मूळातच छान चव असते. हिरवीगार अशी ही गवारीची भाजी दाण्याचा कूट, ओलं खोबरं किंवा अगदी नुसता लसूण आणि कांदा घालूनही फार छान होते. अशी वेगवेगळ्या पद्धतीची गवारीची भाजी आपण अनेकदा करतो. पण गवारीचा ठेचा हा प्रकार तुम्ही क्वचितच ऐकला असेल. जेवणात तोंडी लावायला आपण लाल मिरचीचा, हिरव्या मिरचीचा ठेचा करतो. हा झणझणीत ठेचा असेल की जेवणही ४ घास जास्तच जाते. मिरचीचा ठेचा ठिक आहे पण गवारीच्या ठेच्याची आगळीवेगळी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हा ठेचा कसा करायचा पाहूया (Gawar Thecha Recipe)...
१. पाव किलो गवार स्वच्छ धुवून कोरडी करुन मोडून घ्यायची.
२. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात ८ ते १० हिरव्या मिरच्या आणि साधारण १५ लसणाच्या पाकळ्या घालून त्या चांगल्या परतून घ्यायच्या.
३. लसूण आणि मिरची काढून ठेवून अर्धी वाटी शेंगदाणे याच कढईत तेलात खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
४. दाणे काढून ठेवल्यावर थोडे तेल घालून गवार मऊ होईपर्यंत चांगली परतून घ्या.
५. मिक्सरच्या भांड्यात लसूण, मिरची, दाणे, कोथिंबीर, जीरे आणि मीठ थोडं जाडसर वाटून घ्यायचे.
६. हे सगळे एका बाऊलमध्ये काढून ठेवून नंतर गवारीच्या शेंगा मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
७. पुन्हा कढईत तेल घालून जीरं आणि हळद घालायची आणि त्यावर ही वाटलेली गवार थोडं मीठ घालून चांगली परतून घ्यायची.
८. यामध्ये शेंगदाणे आणि मिरचीचे वाटण घालून पुन्हा सगळे एकसारखे परतून घ्यायचे.