भक्ती चपळगावकर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपनेते चंद्रकांत पाटील यांचे एक विधान गाजते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांचे स्थान स्वयंपाकघरात आहे, असे सूचित केले. राजकारणी सवंग विधाने करतात आणि ते चालून जाते, ही वस्तुस्थिती आहे. पण, आज परिस्थिती अशी आहे की, बातम्यांचे मूळ ‘घटना’ नसून ‘विधाने’ आहेत, हे लक्षात घेऊन तारतम्याने बोलणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न राजकीय वादातून निर्माण झाला असला तरी स्त्रियांबद्दल असे बोलणे सार्वत्रिक आहे. पाटील यांची बाजू घेताना त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा दोष ग्रामीण संस्कृतीला देऊन अजून एक चूक केली. पाटील बोलले ते चूक आहे, पण आपल्या गावाकडे असेच बोलतात, असे ते म्हणाले. आता पाटील यांनी आपण जे बाेललो, त्याप्रकरणी दिलगिरी व्यक्ती केली आहे.
मात्र, पाटील यांच्या विधानामुळे दोन गोष्टींकडे लक्ष वेधले गेले. त्यांनी स्त्रियांचे स्थान फक्त स्वयंपाकघरात आहे (राजकारणात नाही) हे सांगून त्यांनी त्यांचे महत्त्व कमी केले आणि त्याचबरोबर स्वयंपाक करणे हे काम राजकारणापेक्षा कमी दर्जाचे आहे, असेही ठसवण्याचा प्रयत्न केला. मुळात कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, त्यात तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देणारा स्वयंपाक फार महत्त्वाचा आहे. पाटील यांच्या विधानाचे कोणतेही स्पष्टीकरण त्याला योग्य ठरवत नाही. त्यात जिथे लिंगनिरपेक्ष वागणुकीची परीक्षा असते, त्या परीक्षेत एकूण एक राजकीय पक्ष सपशेल नापास होतात. त्यामुळे झालेला प्रकार एका पक्षापुरता मर्यादित नाही.
(Image : Google)
भारतीय उपखंडाने जगातल्या पहिल्या आणि दुसऱ्या महिला पंतप्रधान जगाला दिल्या. हे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या श्रीलंकेच्या सिरिमावो बंदरनायके पहिल्या तर इंदिरा गांधी दुसऱ्या पंतप्रधान. पण, शेवटी आपण बायकांना स्वयंपाक करा हे सांगतो, ते काय दर्शवते? स्त्री आणि पुरुष यांतील भेद दूर करण्यासाठी आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. सवंग राजकारणी आणि स्त्रियांना लिंगसापेक्ष चष्म्यातून बघणाऱ्या समाजाला बदलायचे असेल तर स्वयंपाक या गोष्टीला लिंगनिरपेक्ष काम या दृष्टीने बघितले पाहिजे. बालसंगोपनाबरोबर ज्या जबाबदाऱ्या परंपरेने स्त्रीवर्गाकडे आल्या, त्यात स्वयंपाक ही गोष्ट पण आली. याचा अर्थ आज स्त्रियांच्या वाट्याला फक्त याच जबाबदाऱ्या आहेत असे नाही. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे त्यांचा सहभाग नाही. पण ‘डब्यासाठी कोणती भाजी करू? आणि रात्री भाताबरोबर पिठलं करू की आमटी?’ यासारख्या अत्यंत रटाळ प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधावी लागतात, ही सत्य परिस्थिती आहे. अनेकदा ‘कर काही तरी, यात विचारण्यासारखं काय आहे, विचारतेस काय’? अशी उत्तरं त्यांना ऐकावी लागतात. तेव्हा ‘यात विचारण्यासारखं काहीच नाही म्हणूनच हा फक्त माझाच प्रांत का?’ असा प्रतिप्रश्न रोज त्यांच्या मनात नक्कीच येत असणार.
मुळात स्वयंपाक ही जबाबदारी ज्या कारणांनी स्त्री वर्गाकडे आली ती कारणेही हळूहळू कालबाह्य होत आहेत. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आज मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद न करता त्यांना सक्षम बनवण्यासाठी पालकसारख्या स्तरावर प्रयत्नशील आहेत. शिक्षण आणि अर्थार्जन या क्षेत्रात पन्नास वर्षांपूर्वीपेक्षा आज खूप प्रमाणात समानता आहे, हे मान्य करायला हवे. मग स्वयंपाक हेच क्षेत्र स्त्रियांशी अजून का इतके घट्ट बांधले गेले आहे? कदाचित येणाऱ्या काळात ही वीण सैल होईल. आज अनेक तरुण शहरी जोडपी कामावरून परत येताना पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी विकत घेतात किंवा उपाहारगृहातून जेवण मागवतात. स्वयंपाक सोपा व्हावा म्हणून मुंबईत अनेक ठिकाणी निवडलेल्या, चिरलेल्या भाज्या मिळतात. या सगळ्या गोष्टींतून एका मोठ्या वर्गाला रोजगार मिळाला आहेच, पण घरी स्वयंपाकाचे अवडंबर कमी झाले आहे.
येणाऱ्या पिढीत स्वयंपाक ही बायकांची जबाबदारी असू नये, यासाठी आजच्या पिढीने प्रयत्न केले पाहिजेत. २५ वर्षांपूर्वी पोळी-भाजी केंद्रावरून भाजी आणणाऱ्या स्त्रीकडे कुत्सित नजरेने बघणारे कमी नव्हते. तुमच्या घरी स्वयंपाक होत नाही? घरात बायको काय करते, असे टोमणे मारले जात. चक्क तुम्ही बाहेरून पोळी-भाजी आणता म्हणजे तुम्ही काही गुन्हा करत असल्यासारखी प्रतिक्रिया समाजाकडून ऐकावयास मिळत असे. पण, मुंबईसारख्या शहराने सतत धावणाऱ्या बाईच्या अडचणी सहज समजून घेतल्या आणि पोळी-भाजी केंद्रांनी इथल्या गृहिणींच्या आयुष्यात प्रवेश केला. आज महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्येही पोळी-भाजी केंद्रे चांगली चालतात.
(Image : Google)
गेल्या दोन वर्षांत आपल्या आजूबाजूलाच नव्हे तर जगात अनेक गोष्टी बदलल्या. त्यातल्या काही फक्त महासाथीपुरत्या होत्या, तर काही बदल नेहमीसाठी झाले. यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे फूड डिलिव्हरी उद्योग. या उद्योगात युरोप आणि अमेरिका खंडात फार बदल झाला नसला तरी चीन आणि भारतात छोट्या उपाहारगृहांतून, क्लाऊड किचनमधून, मोठ्या उपाहारगृहांमधून खाद्यपदार्थ मागविणे सर्वमान्य झाले आहे. खिशाला परवडणारे झाले आहे. तुमच्या खिशात जेवढे पैसे त्या बजेटमध्ये तुम्हाला जेवण मागवता येते. पण, मागविलेल्या अन्नाचा दर्जा आणि पोषणमूल्य या दोन समस्या उभ्या राहिल्या. यातून मार्ग काढत काही उपाहारगृहांनी आता आपल्या पदार्थाबरोबरच त्यातील पोषण मूल्यांची माहिती देणे सुरू केले आहे. असे असले तरी हे सर्वांना परवडणारे नाही. त्यात रोज हे शक्य नाही. म्हणजे या प्रश्नाच्या मुळाशी जायचे झाले तर आज पुरुष थोड्याफार प्रमाणात स्वयंपाकघरात दिसू लागले तर त्यांच्या तिथल्या अस्तित्वानेच त्यांच्या मुलाबाळांना हे काम फक्त आईचे नाही याची शिकवण मिळू शकेल. स्वयंपाकाचे अवडंबर कमी करूया. स्वयंपाकघराचा आकार कमी करूया. स्वयंपाकाचे नियोजन घरात राहत असलेल्या सर्वांनी करूया.
वेळ लागला तरी चालेल पण, निदान भविष्यात तरी कोणतीही स्त्री करत असलेले काम तिला जमणार नाही, तिने स्वयंपाक घरातच राहावे, अशा प्रकारची भाषा वापरली जाण्याची वेळ येणार नाही, अशी आशा करूया. राजकारण तात्पुरते असू शकते, सामाजिक बदल लांब पल्ल्याचे ठरतात.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)