Join us  

पराठ्यांचे तेच ते प्रकार खाऊन कंटाळलात? करा भेंडी आणि टमाट्याचे पराठे.. चवबदल म्हणून बेस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 6:24 PM

भेंडी आणि टमाटा या नेहमीच्या भाज्यांपासून वेगळं काही करायचं असेल तर करा चटपटीत चवीचे पराठे

ठळक मुद्देभेंडीच्या पराठ्याच्या सारणाला लागणारं बेसन भाजलेलं असावं आणि दही घट्ट असावं. दह्यात पाणी असल्यास ते काढून टाकावं.

नाश्ता असू देत नाहीतर जेवण पराठे असले का दुसरं काही नसलं तरी चालतं. पोटभरीचा प्रकार म्हणून पराठे उत्तम. पण नेहमी त्याच त्याच चवीचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर चवीढवीला वेगळे आणि स्पेशल असणारे पराठे करता येतात. स्वयंपाकघरातल्या नेहमीह्च्या भाज्य आणि जिन्नसातून चवीला स्पेशल  लागणारे पराठे करता येतात. भेंडी आणि टमाटे या दोन भाज्या हमखास घरात असतातच. भेंडीची भाजी  पटकन होते आणि आरोग्यदायीही असते त्यामुळे  भेंडी घरात असतेच. तर नाश्त्याच्या पदार्थांपासून सलाड- सूपपर्यंत अनेक पदार्थांसाठी टमाटा हा लागतोच. भेंडी आणि टमाटे या दोन भाज्यांपासून उत्तम चवीचे पराठे करता येतात. 

Image: Google

भेंडीचे पराठे कसे करणार?

भेंडीचे पराठे करण्यासाठी 2 कप कणिक, अर्धा किलो भेंडी, 1 कप तेल, 1 चमचा जिरे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळे मिरपूड, 1 चमचा सब्जी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा भाजलेलं बेसन पीठ आणि 2 चमचे घट्ट दही घ्यावं. 

Image: Google

भेंडीच्या भाजीचा सारणाचा अर्थात भरलेला पराठा करण्यासाठी कणकेत थोडं मीठ घालून कणीक थोडं थोडं पाणी घालून मळून मऊ करुन घ्यवी. कणिक 10-15 मिनिटं सेट होवू द्यावी. सारणासाठी भेंडी धुवून सुकवून घ्यावी. भेंडीचे पातळ गोल काप करावेत. कढईत थोडं तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात जिरे, हिरवी मिरची घालून परतावी. भेंडी घालून ती परतून घ्यावी. नंतर यात काळे मिरपूड, सब्जी मसाला आणि मीठ घालून भाजी 10-12 मिनिटं शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर घालून भाजी एका ताटात काढून घ्यावी.

भाजी थोडी गार झाल्यावर त्यात भाजलेलं बेसन पीठ आणि दही घालून ते चांगलं मिसळून घ्यावं.  सारण पूर्ण गार झालं की पराठे करायला घ्यावेत. कणकेची छोटी लाटी घेऊन ती थोडी लाटावी. त्यात भेंडीचं सारण भरावं. पारी मोदकाप्रमाणे भरुन बंद करुन ती पिठावर हलक्या हातानं लाटून घ्यावी. गरम तव्यावर थोडं तेल  घालून पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घ्यावा.  हा पराठा कैरीचं लोणचं किंवा दह्यासोबत छान लागतो. 

Image: Google

टमाट्याचा पराठा

टमाट्याचा पराठा करण्यासाठी 2 कप कणिक, 3 टमाटे, 1 कांदा, आल्याचा मोठा तुकडा, 4 हिरवी मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ 4-5 चमचे तेल, 1 छोटा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरे घ्यावेत. 

Image: Google

टमाट्याचा पराठा करताना  कांदा, टमाटा बारीक चिरुन घ्यावा. आलं किसून घ्यावं. हिरवी मिरची आणि लसूण देखील बारीक कापून घ्यावे. कढईत तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात एक चमचा जिरे, बारीक चिरलेला लसून, हिरवी मिरची आणि कांदा घालून हे सर्व साहित्य 1 ते 2 मिनिटं परतून घ्यावं. नंतर यात किसलेलं आलं आणि टमाटा घालावा. तो परतून घेतला की मीठ, तिखट आणि हळद घालून सर्व जिन्नस नीट परतून घ्यावं. नंतर यात धने पावडर आणि थोडा गरम मसाला घालून तो नीट मिसळून घ्यावा. कढईवर झाकण ठेवून टमाटा चांगला मऊ होईपर्यंत शिजवावा. मधून मधून भाजी हलवावी.  टमाटा मऊ झाला की गॅस बंद करावा.  टमाट्याची भाजी एका ताटात पसरुन ठेवून गार करावी. ती गार झाली की मिक्सरमधून ती वाटून घ्यावी.

वाटलेलं मिश्रण एका ताटात काढून घ्यावं. त्यात कणिक आणि थोडं मीठ घालून मिश्रण नीट मऊसर मळून घ्यवं. पीठ मळून झालं की ते सेट करण्यासाठी 20 मिनिटं झाकून ठेवावं. नंतर पिठाल तेल लावून पीठ मळून मऊ करुन घ्यावं.  पिठाच्या मध्यम आकाराच्या लाट्या करुन पराठे लाटून घ्यावेत. गरम तव्यावर थोडं तेल घालून दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घ्यावेत. टमाट्याचे पराठे टमाटा केचप/ दही/ लोणचं/ नारळ पुदिना चटणी यासोबत छान लागतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आहार योजना