Join us  

थंडीत करा गरमागरम जिंजर-गार्लिक सूप...घशाला आराम, पोटही होईल साफ, घ्या झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 11:19 AM

Ginger Garlic Soup Recipe : बाहेर गारठा असल्याने शरीराला ऊर्जा देतील असे पदार्थ या काळात आवर्जून खाल्ले जातात

ठळक मुद्देयामध्ये आवडीनुसार कांद्याची पात, शिमला मिरची, लिंबाचा रस असे काहीही घातले तरी चांगले लागते.घशाला आराम देण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी हे सूप फायदेशीर ठरते.

थंडीच्या दिवसांत आपल्याला सतत काही ना काही गरमागरम प्यावसं वाटतं. मग आपण चहा किंवा कॉफी घेतो. पण त्यापेक्षा सूप हा अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतो. भाज्यांचे, टोमॅटोचे, मंचाव सूप, कॉर्न, मशरुम, ब्रोकोली, लेमन कोरीएंडर अशी वेगवेगळी सूप आपण हॉटेलमध्ये घेतो. पण घरीही आपण अगदी झटपट हे सूप बनवू शकतो. थंडीत घशाला आराम मिळण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी ही सूप अतिशय फायदेशीर ठरतात. बाहेर गारठा असल्याने शरीराला ऊर्जा देतील असे पदार्थ या काळात आवर्जून खाल्ले जातात, सूप हेही त्यातलेच एक. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर असणारे हे सूप घरी कसे करायचे पाहूया (Ginger Garlic Soup Recipe).

साहित्य 

१. लसूण - अर्धा चमचा

२. आलं - अर्धा चमचा

३. गाजर - पाव वाटी

(Image : Google)

४. फरसबी - पाव वाटी

५. कोबी - पाव वाटी 

६. व्हेजिटेबल स्टॉक - ४ वाट्या

७. कॉर्न फ्लोअर - १.५ चमचा 

८. मीठ - चवीनुसार 

९. मीरपूड - अर्धा चमचा

१०. कोथिंबीर - अर्धी वाटी 

कृती 

१. एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये बारीक केलेले आलं आणि लसूण घाला आणि गॅस बारीक ठेवून चांगले परतून घ्या. 

२. अर्धी वाटी पाण्यात कॉर्नफ्लोअर घालून ते चांगले एकजीव करुन ठेवा.

३. गाजर आणि कोबी बारीक किसून घ्या आणि फसरबी एकदम बारीक चिरुन घ्या. 

४. पॅनमध्ये या भाज्या घालून त्यावर झाकण ठेवा आणि एक वाफ येऊद्या.

५. त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून चांगली उकळी येऊद्या.

६. मग कॉर्नफ्लोअर घालून चांगले एकजीव करा आणि मीठ, मिरपूड घालून ५ ते ७ मिनीटे उकळा. 

७. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घाला आणि गरमागरम सूप प्यायला घ्या.

८. यामध्ये आवडीनुसार कांद्याची पात, शिमला मिरची, लिंबाचा रस असे काहीही घातले तरी चांगले लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.थंडीत त्वचेची काळजी