भारतीय पदार्थ मसालेदार असतात असं नेहमी म्हटलं जातं. पण या मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी चांगले असतात. हे मसाले केवळ चव वाढवण्याचे काम करत नाहीत तर आरोग्याच्या विविध तक्रारींवर ते फायदेशीर असतात. आल्यामध्ये कार्मिनेटिव घटक असतात जे आतड्यांसाठी फायदेशीर असतात. आल्यामुळे गॅसेस, अपचन या समस्या दूर होण्यास मदत होते. चहा हा भारतीयांसाठी अमृतासमान असलेले पेय आहे. थंडीच्या दिवसांत चहामध्ये आलं टाकल्यास त्याचा स्वाद तर बदलतोच पण हा चहा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. याबरोबरच आलेपाक, आल्याच्या वड्या हेही थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी फायदेशीर असते. आल्याचे वाटण घालून केलेल्या उसळी, ग्रेव्हीच्या भाज्या यांच्यावर तर थंडीच्या दिवसांमध्ये ताव मारला जातो. इतकंच नाही तर वाळलेल्या आल्याची पावडर म्हणजे सुंठही काही पदार्थांमध्ये आवर्जून वापरला जातो.
कोलेस्टेऱल कमी करण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आलं एकदम फायदेशीर असते. हे सगळे ठिक असले तरीही कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच त्याचा फायदा होतो, अतिरेक केला तर शरीरावर चुकीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. पण हे आलं प्रमाणात खाल्ले तरच उपयोग आहे, नाहीतर ते शरीरासाठी घातक ठरते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एका दिवसात एका व्यक्तीने केवळ ५ ते ६ ग्रॅम आले खाल्लेले चांगले. त्याहून जास्त खाल्ल्यास त्याचे शरीरावर चुकीचे परिणाम होतात. पाहूयात आल्याचे फायदे
१. पचनक्रिया सुधारण्यास मदत - अनेकांना पचनाच्या विविध तक्रारी सतावत असतात. पचनक्रिया बिघडली की शरीराचे सगळे चक्रच बिघडते. आलं हा यावर उत्तम उपाय असून आल्याच्या सेवनाने बिघडलेली पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
२. मासिक पाळीचा त्रास कमी होण्यास मदत - महिलांना मासिक पाळीमध्ये पोटात आणि कंबरेत कळा येणे तसेच पायात गोळे येणे असे त्रास उद्भवतात. यामुळे महिन्याचे चार दिवस अजिबात नकोसे होतात. पण आल्याचे सेवन केल्यास हा त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
३. घसा खवखवणे कमी होते - थंडीच्या दिवसांत एकदम थंड हवा पडल्यास वातावरण बदलाने आणि तापमानात बदल झाल्याने घसा खवखवण्याची समस्या उद्भवते. अशावेळी अनेक जण आलेपाक किंवा आल्याच्या वड्या खाताना दिसतात. तसेच या काळात सुंठवडाही खाल्ला जातो. यामुळे घशाला आराम मिळतो.
४. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत - आलं हा भारतीय मसाल्यांमधील महत्त्वाचा घटक असून त्याचा प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही चांगला उपयोग होतो. त्यामुळे आल्याचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.
५. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत - शुगर हा सध्या अतिशय कळीचा मुद्दा झाला आहे. तारुण्यात शुगर असलेल्यांची संख्या वाढत असून ही जीवनशैलीविषयक समस्या झाली आहे. रक्तातील साखर वाढल्याने हळुहळू त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे ही शुगर नियंत्रणात ठेवायची असल्यास आल्याचा काही प्रमाणात उपयोग होतो.
६. वजन कमी करण्यास उपयुक्त - लठ्ठपणा ही सध्या एक मोठी समस्या झाली आहे. वाढलेल्या वजनामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होत असल्याने वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण आटोकाट प्रयत्न करताना दिसतो. आल्याचा रस किंवा आल्याचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते.
म्हणून जास्त आले खाणे धोकादायक
कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठात डायटीशि्अन आणि न्यूट्रीशनिस्ट म्हणून काम करणाऱ्या क्रिस्टा ब्राऊन यांनी नुकताच याबाबतचा अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, दररोज आलं ४ ते ५ ग्रॅम याच प्रमाणात खायला हवे. ६ ग्रॅमहून जास्त आलं खाणाऱ्यांमध्ये नकारात्मक दुष्परिणाम झाल्याचे दिसते. यामुळे उद्भवणारे ५ तोटे पाहूया...
१. घशात जळजळ होते - एकीकडे सर्दी-ताप झाल्यावर आले चांगले असते असे आपण म्हणतो पण हेच आले जास्त प्रमाणात खाल्ल्यास घशात जळजळ होण्याची शक्यता असते. आलं काही प्रमाणत तिखट असते त्यामुळे हा तिखटपणा घशाला सोसत नाही आणि घशाची आग किंवा जळजळ होते.
२. जुलाबाची समस्या - आलं पचनक्रिया सुरळीत राहावी यासाठी चांगले असते असं म्हणत असतानाच त्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा पोटाला त्रास होऊन जुलाब होऊ शकतात. एका अभ्यासानुसार आलं जास्त प्रमाणात खाल्लेल्या काही लोकांना मळमळ आणि जुलाबाचा त्रास झाला.
३. किडनीसाठी घातक - ज्यांना किडनीचे आजार आहेत अशा लोकांनी आलं खाणे चांगले नसते. नॅशनल किडनी फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार किडनीसाठी घेत असलेल्या औषधांसोबत आलं खाल्ले गेले तर या औषधांमध्ये बाधा येऊ शकते.
४. रक्तस्राव होण्यास कारणीभूत - रक्त पातळ करण्याची औषधे घेत असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात आलं खाणं टाळायला हवं. तसेच आपण अनेकदा आलं-लसूण पेस्ट एकत्रित वापरतो. मात्र अशाप्रकारे आलं-लसूण एकत्र करणेही घातक असते. यामुळे अशा व्यक्तीना कुठे लागले, खरचटले तर लगेच आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो.
५. हृदयासाठी धोकादायक - आलं अति प्रमाणात खाल्ले तर ते हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले नसते. हृदरोगाशी संबंधित औषधे घेत असाल तर आल्यामुळे या औषधांचा शरीरावर परिणाम कमी होतो. तसेच आलं जास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी काळजी घ्यायला हवी.