लग्नकार्य म्हटल्यावर त्याठिकाणी असणारी मेहेंदी, हळद, देवकार्य आणि मग लग्न, पूजा असे बरेच विधी असतात. मग हे लग्न आपल्या घरातील किंवा जवळच्या मित्रमैत्रीणीचे असेल तर आपल्याला हे सगळे कार्यक्रम अटेंड करण्याशिवाय पर्याय नसतो. लग्नघर म्हटल्यावर याठिकाणी जेवणाचे बेत असतातच. अनेकदा या जेवणामध्ये तळकट, मसालेदार आणि गोड पदार्थ असतात. खाताना ते छान वाटत असले तरी त्यामुळे आपल्याला अॅसिडीटी होण्याची किंवा पोट जड होणअयाची समस्या उद्भवू शकते. एकमेकांच्या सोबतीने गप्पा मारत आपण नेहमीपेक्षा ४ घास जास्तच खातो (Ginger lemon Rassam Recipe) .
त्यातही उन्हाळी आणि पावसाळी अशी दमट हवा असल्याने खाल्लेले अन्न नीट पचत नाही. अशावेळी पोटाला थोडा आराम मिळावा म्हणून आपण एकतर लंघन करतो किंवा काहीतरी हलकं खायचं ठरवतो. पण जास्तीच्या खाण्याने किंवा नेहमीपेक्षा वेगळं खाल्ल्याने पोट आणि पचनसंस्थेवर आलेला ताण कमी करायचा असेल तर त्यासाठी एका खास रेसिपी आज आपण पाहणार आहोत. साऊथ इंडियन पदार्थातील प्रसिद्ध अशी रस्समची ही रेसिपी असून त्यात आलं आणि लिंबाचा वापर केल्याने ती पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. हे रस्सम कसं करायचं पाहूया...
१. साधारण ३ वाट्या तूर डाळ २० मिनीटांसाठी भिजत घालावी.
२. या भिजलेल्या डाळीत कडीपत्ता, कोथिंबीर, हळद आणि ३ टोमॅटो घालायचे आणि साधारण ४ कप पाणी घालून ही डाळ कुकरला ४ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची.
३. कुकरचे झाकण काढल्यावर ही डाळ स्मॅशरने किंवा रवीने चांगली बारीक करुन घ्यायची आणि गाळणीने गाळायची, म्हणजे आपल्याला त्याचे एकसारखे सूप मिळते.
४. यामध्ये गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून ती एकसारखी करुन घ्यायची.
५. मिक्सरच्या भांड्यात १ चमचा काळी मिरी, २ चमचा जीरे, ३ चमचे आलं आणि ३ -४ मिरच्या घेऊन ते मिक्सरमध्ये चांगले बारीक करुन घ्यायचे.
६. हे बारीक केलेले मिश्रण डाळीत घालायचे आणि त्यात आवडीनुसार गूळ घालून ते गॅसवर उकळायला ठेवायचे.
७. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि आवडीनुसार यामध्ये लिंबाचा रस घालावा, साधारण २ लिंबांचा रस चालू शकतो.
८. दुसरीकडे फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये २ चमचे तूप घालून मोहरी आणि मेथ्यांची फोडणी करायची.
९. हे दोन्ही चांगले तडतडले की यामध्ये लाल मिरची आणि हिरवी मिरची आवडीनुसार घालायची. हिंग, हळद आणि कडीपत्ता घालून ही फोडणी चांगली झाली की ती रस्समवर घालायची.
१०. वरुन भरपूर कोथिंबीर घालून हे गरमागरम रस्सम भातासोबत खायचे.