Join us  

साध्या नारळ पाण्याला द्या मसालेदार ट्विस्ट; करा नारळ पाण्याची शिकंजी.. उन्हाळ्यातलं कूल सरबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2022 7:42 PM

तहान भागण्यासोबतच शरीराला ऊर्जा मिळणं, ताजेपणा-उत्साह वाटणं, तोंडाला चव येणंही आवश्यक असतं. या सगळ्याचा विचार करता करा नारळ पाण्याची शिकंजी उत्तम

ठळक मुद्देलिंबू सरबताच्या शिकंजीसारखीच नारळ पाण्याचीही शिकंजी करता येते. शिकंजीसाठी सोडा वाॅटर किंवा साधं पाणी वापरावं.

उन्हाळ्यात शरीराला बाहेरुन थंडाव्याची गरज असते तसाच आतूनही थंडावा मिळणं आवश्यक असतो. शरीरात आतून पुरेशी आर्द्रता/ ओलावा असल्यास शरीराला थंडावा मिळतो. म्हणूनच उन्हाळ्यात पाण्यासोबतच सरबतं, ज्यूस, लस्सी, नारळ पाणी पिण्याला महत्व आहे. तहान भागण्यासोबतच शरीराला ऊर्जा मिळणं, ताजेपणा-उत्साह वाटणं, तोंडाला चव येणंही आवश्यक असतं. या सगळ्याचा विचार करता शिकंजी पिणं फायदेशीर ठरतं.

Image: Google

उन्हाळ्यात नारळपाणी पिणं आरोग्यासाठी उत्तम असतं. पण सारखं नुसतं नारळ पाणी पिणंही नकोसं वाटतं. अशा वेळेस नारळ पाण्याची शिकंजी करुन प्याल्यास थंडावा, चव, ताजेपणा या सर्वच गरजा पूर्ण होतात. शिकंजी म्हटलं की मसाला शिकंजी, लिंबाची शिकंजी एवढंच माहीती असतं. पण नारळ पाण्याचीही शिकंजी करता येते. ही शिकंजी करायला फक्त 5 मिनिटं लागतात. 

कशी करतात नारळ पाण्याची शिकंजी?

नारळ पाण्याची शिकंजी करण्यासाठी  1 ग्लास नारळ पाणी, 2 चमचे पिठी साखर, चिमूटभर काळं मीठ, 1 चमचा आल्याचा रस, 2-3 लिंबं आणि  1 ग्लास सोडा वाॅटर किंवा साधं पाणी घ्यावं. 

Image: Google

नारळाची शिकंजी करताना आधी एका ग्लासमध्ये नारळाचं ताजं पाणी घ्यावं.  त्यात पिठीसाखर घालून पाणी चांगलं हलवून घ्यावं. दुसऱ्या ग्लासमध्ये सोडा वाॅटर/ साधं पाणी  घ्यावं. त्यात लिंबाचा रस पिळून घालावा. एका मोठ्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या भांड्यात  लिंबू घातलेलं पाणी घ्यावं. त्यात नारळाचं पाणी घालावं. ते दोन्ही चांगलं एकत्र मिसळून त्यात आल्याचा रस घालावा.  2-3 तास हे भांडं फ्रिजमध्ये ठेवून शिकंजी गार करुन घ्यावी. शिकंजी पिताना त्यात काळं मीठ आणि  पुदिन्याची पानं घालून प्यावी.

टॅग्स :आहार योजनाअन्न