Lokmat Sakhi >Food > ऊन ऊन खिचडी साजूक तूप.. नेहमीच्या खिचडीला द्या टेस्टी ट्विस्ट,करा खिचडीचे 3 प्रकार 

ऊन ऊन खिचडी साजूक तूप.. नेहमीच्या खिचडीला द्या टेस्टी ट्विस्ट,करा खिचडीचे 3 प्रकार 

डाळ तांदळाची खिचडी ही सपकच लागावी किंवा त्यात तांदूळ असायलाच हवेत असा काही नियम आहे का? तांदूळ न घालताही खिचडी होते. तसेच डाळ तांदळाची खिचडीही छान चटकमटक होते. चविष्ट खिचडी करण्याचे तीन मार्ग आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:25 PM2021-07-21T16:25:53+5:302021-07-21T16:35:56+5:30

डाळ तांदळाची खिचडी ही सपकच लागावी किंवा त्यात तांदूळ असायलाच हवेत असा काही नियम आहे का? तांदूळ न घालताही खिचडी होते. तसेच डाळ तांदळाची खिचडीही छान चटकमटक होते. चविष्ट खिचडी करण्याचे तीन मार्ग आहेत.

Give the tasty twist to usual khichdi by making 3 types of khichdi | ऊन ऊन खिचडी साजूक तूप.. नेहमीच्या खिचडीला द्या टेस्टी ट्विस्ट,करा खिचडीचे 3 प्रकार 

ऊन ऊन खिचडी साजूक तूप.. नेहमीच्या खिचडीला द्या टेस्टी ट्विस्ट,करा खिचडीचे 3 प्रकार 

Highlightsपालक प्युरी, पातीचा कांदा आणि चिज घातलेली हरी भरी खिचडी नावंच तोंडाला पाणी आणतं.तांदळाशिवाय खिचडी अशक्यच. पण पोहे मूग खिचडी केली तर शक्य आहे.मिक्स भाज्या घालून शिजवलेली, वरुन तडका आणि खाताना वरुन पापडाचा चुरा वर्‍हाडी खिचडी हमखास आवडणारच!

 खिचडी ही कितीही पौष्टिक असली तरी ती खाण्याचा मात्र कंटाळा येतो. ती सपक लागते म्हणून नकोशी वाटते. पण डाळ तांदळाची खिचडी ही सपकच लागावी किंवा त्यात तांदूळ असायलाच हवेत असा काही नियम आहे का? तांदूळ न घालताही खिचडी होते. तसेच डाळ तांदळाची खिचडीही छान चटकमटक होते. चविष्ट खिचडी करण्याचे तीन मार्ग आहेत. यात पौष्टिक घटकांसोबतच चव आणणारे घटकही आहेत. अशा पध्दतीनं खिचडी केली तर रोज खिचडी म्हटली तरी कपाळावर आढ्या पडणार नाही, स्वत:च्याही आणि इतरांच्याही.

 

छायाचित्र- गुगल 

चिजी हरी भरी खिचडी

ही खिचडी करण्यासा पाव कप किसलेलं चिज खिचडीत टाकण्यासाठी आणि थोडं जास्त खिचडी झाल्यावर वरुन टाकण्यासाठी, पाव कप मटार, अर्धा कप अख्खे मूग ( रात्रभर भिजवून निथळून घेतलेले), अर्धा कप पालक प्युरी, 1 किंवा 2 पाती कांद्याची पात बारीक चिरलेली, दोन तीन पातीचा कांदा गोलसर चिरलेला, दिड कप तांदूळ ( 15-20 मिनिट आधी भिजवून आणि निथळून घेतलेले), एक मोठा चमचा तूफ़, एक छोटा चमचा जीरे, एक मोठा चमचा चिरलेला लसूण, 3- 4 कप पाणी खिचडी करताना आणि अधिक अर्धा कप जास्त पाणी खिचडी शिजल्यानंतर टाकायला आणि चवीसाठी मीठ ही सामग्री लागते.

खिचडी करताना

कुकरमधे तूप गरम करावं. तूप गरम झालं की जीरे, लसूण टाकून अर्धा मिनिट सोनेरी होईपर्यंत परतावं. त्यानंतर पातीचा कांदा टाकून मिनिटभर परतावा आणि मग त्यात हिरवे मूग घालावेत. ते मिनिटभर परतून घ्यावे. धुवून निथळून घेतलेले तांदूळ , मीठ आणि तीन चार कप पाणी घालावं पाणी गरम घ्यावं. कुकरला झाकण लावून पाच सहा शिट्ट्या घ्याव्यात. कुकरची वाफ गेल्यावर त्यात पालक प्युरी, कांद्याची बारीक चिरलेली पात घालावी. एक मिनिट कुकरवर झाकणी ठेवून ते शिजू द्यावं. मग त्यात अर्धा कप गरम पाणी घालून खिचडी हलवावी. आणि पुन्हा झाकणी ठेवून दोन मिनिटं शिजू द्यावी.मग त्यात चिज घालावं आणि खिचडी पुन्हा हलवून घ्यावी. शेवटी खिचडीवर किसलेलं चिज घातलं की चिजी हरभरी खिचडी तयार होते.

 छायाचित्र- गुगल 

पोहे मूग डाळ खिचडी

ही खिचडी करण्यासाठी 100 ग्रॅम  मुगाची हिरवी किंवा पिवळी डाळ , 100 ग्रॅम पोहे, दोन मोठे चमचे सांबर मसाला, एक चमचा गूळ, दोन चमचे चिंचेचा कोळ, दालचिनीचा एक छोटा तुकडा, दोन कप मिक्स भाज्या( घेवडा, बटाटा, गाजर, टमाटा, सिमला मिरची, हिरवे मटार) एक मध्यम आकाराचा कांदा चिरुन, एक चमचा हळद, एक चमचा मोहरी , 7-8 कढीपत्त्याची पानं,दोन ते तीन कप पाणी , तेल आणि मीठ हे साहित्य घ्यावं.

खिचडी करताना

आधी पोहे धुवून 15 मिनिटं बाजूला ठेवावेत. प्रेशर कुकर मंद आचेवर गरम करावा. त्यात मूगाची डाळ , भाज्या आणि दोन ते तीन कप पाणी घालून ते गरम होवू द्यावं. पाणी उकळ्लं की कुकरचं झाकण लावून एक किंवा अर्धी शिट्टी घ्यावी. नंतर एका कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की त्यात हळद , दालचिनी, कढीपत्ता घालावा आणि ते थोडं परतून घ्यवं. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर परतून घ्यावा. नंतर त्यात अर्धवट शिजवलेली डाळ आणि भाज्यांचं मिश्रण , निथळून ठेवलेले पोहे, मीठ, सांबर मसाला, गूळ, चिंचेचा कोळ घालून मिश्रण हलवावं. त्यात थोडं गरम पाणी घालावं आणि खिचडी पुन्हा हलवून घ्यावी. कढईवर झाकण ठेवून ती 10 -15 मिनिटं शिजवून घ्यावी. मस्त गरम गरम खावी.

वर्‍हाडी खिचडी

या खिचडीसाठी दोन कप तांदूळ ( अर्धा तास भिजवलेले), एक कप तूर डाळ ( अर्धा तास भिजवलेली), पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या, दोन मोठे चमचे तेल, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, सहा कप पाणी आणि तळलेल्या नागलीच्या किंवा उडदा मुगाच्या पापडाचा चुरा आणि तडक्यासाठी मोहरी, दोन चिमूट हिंग, चार पाच सुक्या लाल मिरच्या, चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या हे साहित्य घ्यावं.

खिचडी करताना

 प्रेशर कुकरमधे तेल घालून ते गरम करावं. गरम तेलात चिरलेला लसूण, मीठ, हळद, घालून ते परतून घ्यावं, नंतर त्यात भिजवलेले तांदूळ, तूर डाळ आणि सहा कप पाणी घालावं. झाकण लावून कुकरला तीन शिट्या घ्याव्यात. वाफ जाईपर्यंत कुकर बाजूला ठेवावा.
तडक्याच्या कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी घालावी, ती तडतडली की त्यात हिंग, लसूण आणि मिरच्या घालाव्यात. लसूण लालसर होईपर्यंत ते परतावं. कुकरचं झाकण काढून घ्यावं. त्यावर हा तडका घालावा. खिचडी खाताना त्यावर चुरलेला पापड घ्यावा.

Web Title: Give the tasty twist to usual khichdi by making 3 types of khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.