Join us  

सॉफ्ट, स्पॉन्जी ढोकळ्याला द्या तंदूरचा तडका; जाणून घ्या हटके झटपट रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2023 11:53 AM

Tandoori Dhokla Recipe ढोकळा म्हटलं की, आपल्याला सॉफट, स्पंजी, थोडी आंबट चव असलेला ढोकळा आठवतो. ट्राय करा हटके तंदुरी ढोकला, झणझणीत चव प्रत्येकाला आवडेल..

गुजराती लोकांमध्ये नाश्ता म्हटलं की ढोकळा, फाफडा, जिलेबी हे पदार्थ पाहायला मिळतात. त्यांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे ढोकळा. ढोकळा हा डाळ आणि रवापासून बनवला जातो. हा हेल्दी नाश्ता आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. चवीला देखील उत्कृष्ट लागते. आपण सॉफट, स्पंजी, थोडी आंबट चव असलेला ढोकळा खाल्लाच असेल. मात्र, आपण कधी तंदुरी ढोकळ्याची चव चाखली आहे का? मार्केटमध्ये तंदुरी मोमोस, तंदुरी बिर्याणी, तंदुरी चहा असे तंदूरचे बरेच प्रकार बाजारात मिळतात. दरम्यान, साध्या ढोकळ्याला तंदूरचा तडका देऊन पाहा. ही रेसिपी चवीला उत्तम, आणि झटपट बनते. चला तर मग या झणझणीत पदार्थाची कृती जाणून घेऊया. 

तंदुरी ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ कप बेसन

हळद

आलं लसूण पेस्ट

दही

फ्रूट सॉल्ट

मोहरी

कडी पत्ता

तेल

मीठ

लाल तिखट

तंदुरी मसाला

कृती

बॅटर बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका भांड्यात बेसन, हळद, आलं लसूण पेस्ट, दही, फ्रुट सॉल्ट, तंदुरी मसाला, लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकत्र करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात पाणी टाकून बॅटर तयार करा. 

बॅटर तयार झाल्यानंतर एका मोठ्या ताटाला तेल लावा. आणि त्यात बॅटर सर्वत्र पसरवून घ्या. बॅटर टाकल्यानंतर स्टीमरमध्ये ढोकळ्याला वाफ द्या. ढोकळा रेडी झाल्यानंतर बाहेर थंड होण्यासाठी काढून ठेवा.

तंदुरी ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे क्युब्समध्ये काप करून घ्या. फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल, कडीपत्ता, मोहरी, टाकून फोडणी ढोकळ्यावर टाका. शेवटी तंदुरी मसाला शिंपडा. अशाप्रकारे झणझणीत तंदुरी ढोकळा खाण्यासाठी रेडी. आपण हा ढोकळा तळलेली हिरवी मिर्च, गोड आणि तिखट चटणीसह खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स