Join us  

गोली इडली, नाम भी नहीं सूना? फक्त वीस मिनिटात होणारी चविष्ट गोलमटोल इडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 6:18 PM

गोल आकाराची आप्प्यांसारखी दिसणारी ही गोली इडली. ती बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजवणं, वाटणं, आंबवणं असे प्रकार करावे लागत नाही. मग कशी करतात ही इडली?

ठळक मुद्देसकाळच्या घाईच्या वेळेतही ही गोली इडली तयार करता येते.अगदी वीस मिनिटात होणारी ही इडली खाण्यासही उत्तम लागते. या इडलीची चव आणखी वाढते ती स्पेशल साउथ इंडियन स्टाइल तडक्याने.

 

इडली हा दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ. पण आज या इडलीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार पोतानं, चवीनं वेगळा आहे. इडलीचा आणखी एक नवीन प्रकार लोकप्रिय होतो आहे तो म्हणजे गोली इडली. गोल आकाराची आप्प्यांसारखी दिसणारी ही इडली. ती बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजवणं, वाटणं, आंबवणं असे प्रकार करावे लागत नाही. इडली करायला सोपी असली तरी त्यासाठी बरीच तयारी असते त्यासाठी जो वेळ लागतो तो गोली इडली बनवण्यास लागत नही. सकाळच्या घाईच्या वेळेतही ही गोली इडली तयार करता येते. अगदी वीस मिनिटात होणारी ही इडली खाण्यासही उत्तम लागते.

गोली इडली तयार करण्यासाठी एक कप पाणी, एक छोटा चमचा मीठ, एक छोटा चमचा तूप, एक कप तांदळाचं पीठ, दोन मोठे चमचे तेल, एक चमचा मोहरी, दिड चमचा हरभरा डाळ, एक छोटा चमचा उडदाची डाळ, दोन छोटे चमचे तीळ, एक लाल मिरची, कढीपत्त्याची पानं, कापलेली हिरवी मिरची आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट लागते .

गोली इडली कशी कराल?

आधी एका भांड्यात पाणी उकळण्यास ठेवावं. त्यात मीठ, आणि तूप टाकावं. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचं पीठ घालावं. ते चांगलं घोटून थोडी वाफ काढावी. हे पीठ थोडं थंड झालं की हातानं अगदी मऊ होईपर्यंत मळून घ्यावं. आवश्यकता वाटल्यास थोडं गरम पाणी घालावं.पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करावेत. हे गोळे 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यावेत. ही गोली इडलीची चव वाढते ती स्पेशल साउथ इंडियन स्टाइल तडक्याने.

कढईत तेल गरम करावं. त्यत उडदाची डाळ, हरभरा डाळ, मोहरी, हिरवी मिरची, कढी पत्ता, तीळ, लाल मिरची आणि आल्याची पेस्ट घालावी. दोन तीन मिनिटं ही फोडणी तडतडू द्यावी. मग यात उकडलेले गोळे घालावेत. ते चांगले फोडणीत मिसळावेत. सर्वात शेवटी मूठभर कोथिंबीर भुरभुरावी.ही गोली इडली हिरवी चटणी किंवा टोमॅटोच्या चटणीसोबतही छान लागते. जेवणासाठी केली असल्यास सांबारासोबतही छान लागते.