Join us  

दिवाळीचा फराळ आणि गोडधोड खाऊन कंटाळा आला? करा मस्त झणझणीत गोळ्याची आमटी, घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 4:36 PM

Golyachi Aamti Easy Spicy Recipe : या गोळ्याच्या आमटीसाठी घरात सहज उपलब्ध असणारेच जिन्नस लागतात

दिवाळी म्हटली की लाडू, करंजी, शंकरपाळी, मिठाया असं काही ना काही सतत गोडधोड खाणं होतं. तसंच वर्षातला मोठा सण असल्याने आपण पाहुण्यांना घरी जेवायला आणि फराळाला घरी बोलावतो. त्यावेळीही आवर्जून काहीतरी गोडाधोडाचे जेवण केले जाते. काही वेळा गोड खाण्याची इच्छा होत असली तरी अशावेळी सतत गोड खाऊन आपल्याला नकोसे व्हायला लागते. अशावेळी आपल्याला काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा होते. आपला रोजचा स्वयंपाक आणि भाज्या म्हणाव्या तितक्या तिखट नसतात. पण मुद्दामहून थोडी तिखट आणि चमचमीत काहीतरी खायचे असेल तर गोळ्याची आमटी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. खान्देशातील हा पारंपरिक पदार्थ करायला सोपा, नेहमीपेक्षा वेगळा आणि झणझणीत असल्याने सगळेच आवडीने खातात. या गोळ्याच्या आमटीसाठी घरात सहज उपलब्ध असणारेच जिन्नस वापरले जात असल्याने त्यासाठी फार वेगळं काही विकत आणावे लागत नाही. भाकरी, पोळी, भात अशा कशासोबतही अतिशय चविष्ट लागणारी ही आमटी कशी करायची पाहूया (Golyachi Aamti Easy Spicy Recipe)...

साहित्य -

१. बेसन पीठ - १ वाटी 

२. धणे-जीरे पावडर - १ चमचा 

३. तीळ - अर्धा चमचा 

४. तिखट - १ चमचा 

५. कांदा-लसूण मसाला - अर्धा चमचा

६. मीठ - चवीपुरते

(Image : Google)

७. आलं लसूण पेस्ट - अर्धा चमचा  

८. कोथिंबीर - अर्धी वाटी 

९. ओलं खोबरं - अर्धी वाटी 

१०. कांदा - २ मोठे 

११. तेल - अर्धी वाटी

१२. हळद - अर्धा चमचा 

कृती - 

१. बेसन पीठ घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मसाला, धणेजीरे पावडर, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट, मीठ घालायचं. 

२. मग यामध्ये थोडं तेल घालून पीठ हाताने हळूहळू मळायचा प्रयत्न करायचा. 

३. थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं. 

४. १० मिनीटे हे पीठ झाकून ठेवून नंतर त्याचे लहान आकाराचे गोळे करुन घ्यायचे. 

५. मिक्सरमध्ये लसूण,ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून त्याचे वाटण करुन घ्यायचे.

६. कढईमध्ये तेल घालून त्यात कांदा चांगला परतून घ्यायचा. 

(Image : Google)

७. सोनेरी रंग आला की त्यामध्ये मिक्सर केलेले वाटण, मसाला, तिखट, धणे-जीरे पावडर, मीठ घालून तेलावर चांगले परतून घ्यायचे.

८. यामध्ये भरपूर गरम पाणी घालून उकळी आणायची. 

९. मग त्यात गोळे घालून १० मिनीटे बारीक गॅसवर चांगले शिजवायचे. 

१०. गोळे शिजल्यानंतर चांगले फुलतात आणि वर येतात. 

११. वरुन कोथिंबीर घालून ही गोळ्याची गरमागरम आमटी भाकरी किंवा भाजीसोबत खायला घ्यायची. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.