Join us  

खांदेशी झणझणीत गोळ्यांची आमटी खाऊन तर पाहा, जेवण होईल फक्कड! घ्या पारंपरिक रेसिपी- भाजीला चमचमीत पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 4:02 PM

Golyachi Aamti khandesh Special aamti Recipe : रोज तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर करता येईल असा चमचमीत पर्याय...

रोज उठलं की आपल्याला सगळ्यात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे आज कोणती भाजी करायची? भाजी हा आपल्या जेवणातील सगळ्यात जास्त चविष्ट पदार्थ असल्याने ती चांगली असेल तरच जेवण पोटभर जाते. पण रोज काय भाजी करायची असा प्रश्न आपल्याला असतोच. मग कधी फळभाजी, कधी पालेभाजी कधी एखादी उसळ किंवा आणखी काहीतरी करुन आपण यामध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही आपल्याला काहीवेळा झणझणीत आणि चमचमीत काहीतरी खावसं वाटतं. अशावेळी जेवणात करता येईल अशी एक भन्नाट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ती म्हणजे गोळ्याची आमटी, खान्देशात केली जाणारी ही स्पेशल रेसिपी कशी करायची पाहूया(Golyachi Aamti khandesh Special aamti Recipe)...

साहित्य -

१. बेसन पीठ - १ वाटी 

२. धणे-जीरे पावडर - १ चमचा 

३. तीळ - अर्धा चमचा 

(Image : Google)

४. तिखट - १ चमचा 

५. कांदा-लसूण मसाला - अर्धा चमचा

६. मीठ - चवीपुरते

७. आलं लसूण पेस्ट - अर्धा चमचा  

८. कोथिंबीर - अर्धी वाटी 

९. ओलं खोबरं - अर्धी वाटी 

१०. कांदा - २ मोठे 

११. तेल - अर्धी वाटी

१२. हळद - अर्धा चमचा 

कृती - 

१. बेसन पीठ घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मसाला, धणेजीरे पावडर, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट, मीठ घालायचं. 

२. मग यामध्ये थोडं तेल घालून पीठ हाताने हळूहळू मळायचा प्रयत्न करायचा. 

३. थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं. 

४. १० मिनीटे हे पीठ झाकून ठेवून नंतर त्याचे लहान आकाराचे गोळे करुन घ्यायचे. 

५. मिक्सरमध्ये लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून त्याचे वाटण करुन घ्यायचे.

६. कढईमध्ये तेल घालून त्यात कांदा चांगला परतून घ्यायचा. 

७. सोनेरी रंग आला की त्यामध्ये मिक्सर केलेले वाटण, मसाला, तिखट, धणे-जीरे पावडर, मीठ घालून तेलावर चांगले परतून घ्यायचे.

८. यामध्ये भरपूर गरम पाणी घालून उकळी आणायची. 

९. मग त्यात गोळे घालून १० मिनीटे बारीक गॅसवर चांगले शिजवायचे. 

१०. गोळे शिजल्यानंतर चांगले फुलतात आणि वर येतात. 

११. वरुन कोथिंबीर घालून ही गोळ्याची गरमागरम आमटी भाकरी किंवा भाजीसोबत खायला घ्यायची.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.