पावसाळ्याच्या दिवसांत पालेभाज्या जास्त खाऊ नयेत म्हटले जाते. तसेच फळभाज्यांमध्येही किड किंवा अळ्या असण्याची शक्यता असते. सॅलेड आणि कडधान्य या काळात पचायला जड असतात. अशावेळी जेवायला करायचं तरी काय असा आपल्याला प्रश्न पडतो. पावसामुळे बाहेर गारठा असल्याने गरमागरम आणि चविष्ट काहीतरी ताटात असावे असे आपल्याला वाटत असते. गोळ्याची आमटी हा असाच एक खास पदार्थ. पोळी, भाकरी, भात अशा कशासोबतही खाऊ शकतो आणि झटपट होणारा चविष्ट असा हा बेत पावसाळ्याच्या दिवसांत नक्की ट्राय करा. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून केली जाणारी ही गरमागरम आमटी पावसाळ्यात फार भन्नाट लागते. घरातील सगळ्यांना आवडणारी ही पारंपरिक रेसिपी कशी करायची पाहूया (Golyachi Aamti Monsoon Special Recipe)...
साहित्य -
१. बेसन पीठ - १ वाटी
२. धणे-जीरे पावडर - १ चमचा
३. तीळ - अर्धा चमचा
४. तिखट - १ चमचा
५. कांदा-लसूण मसाला - अर्धा चमचा
६. मीठ - चवीपुरते
७. आलं लसूण पेस्ट - अर्धा चमचा
८. कोथिंबीर - अर्धी वाटी
९. ओलं खोबरं - अर्धी वाटी
१०. कांदा - २ मोठे
११. तेल - अर्धी वाटी
१२. हळद - अर्धा चमचा
कृती -
१. बेसन पीठ घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मसाला, धणेजीरे पावडर, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट, मीठ घालायचं.
२. मग यामध्ये थोडं तेल घालून पीठ हाताने हळूहळू मळायचा प्रयत्न करायचा.
३. थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं.
४. १० मिनीटे हे पीठ झाकून ठेवून नंतर त्याचे लहान आकाराचे गोळे करुन घ्यायचे.
५. मिक्सरमध्ये लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून त्याचे वाटण करुन घ्यायचे.
६. कढईमध्ये तेल घालून त्यात कांदा चांगला परतून घ्यायचा.
७. सोनेरी रंग आला की त्यामध्ये मिक्सर केलेले वाटण, मसाला, तिखट, धणे-जीरे पावडर, मीठ घालून तेलावर चांगले परतून घ्यायचे.
८. यामध्ये भरपूर गरम पाणी घालून उकळी आणायची.
९. मग त्यात गोळे घालून १० मिनीटे बारीक गॅसवर चांगले शिजवायचे.
१०. गोळे शिजल्यानंतर चांगले फुलतात आणि वर येतात.
११. वरुन कोथिंबीर घालून ही गोळ्याची गरमागरम आमटी भाकरी किंवा पोळीसोबत खायला घ्यायची.