आले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या गुणधर्माबद्दल आपण आपल्या आजीबाईकडून ऐकलंच असेल. आल्यामधून आपल्या शरीराला उत्तम फायदे मिळतात. सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्याचं काम आले करते. जगभर आल्याचा उपयोग मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून होतो.
आले हे अँटी इंफ्लामेटरी आणि अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, यासह ते एक उत्कृष्ट इम्युनिटी बूस्टर आहे. इतकंच नाही तर आल्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. आजारी पडल्यावर आले खाण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुलं आले खाण्यास टाळतात. अशा वेळी आपण जिंजर कँडी बनवून देऊ शकता. जे खाल्ल्याने मुलांना सर्दी, खोकला, घसा खवखवणे, इन्फेक्शन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
जिंजर कँडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
आले
गूळ
हळद
काळे मीठ
काळी मिरी पावडर
देशी तूप
पिठी साखर
जिंजर कँडी बनवण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम, आले स्वच्छ धुवून घ्या. आले धुवून झाल्यानंतर सुकवून घ्या. त्यानंतर आले मंद आचेवर भाजून घ्या. आल्याची वरील साल काळी पडल्यावर गॅस बंद करा. नंतर आले एका भांड्यात थंड होण्यासाठी ठेवा. आले थंड झाल्यानंतर आल्याची वरची साल काढा. हे साल चाकूच्या साहाय्याने सोलून घ्या.
आले सोलून झाल्यानंतर त्याचे लहान तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. आता एक कढई घ्या. त्या कढईत एक चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर आल्याची पेस्ट घाला. पेस्ट तुपात चांगले भाजून घ्या.
आल्याची पेस्ट गोल्डन ब्राऊन झाली की, त्यात ३०० ग्रॅम गूळ घाला. आता सर्व गूळ वितळेपर्यंत ढवळत राहा. सर्वकाही नीट मिक्स झाल्यानंतर त्यात हळद, काळीमिरीपूड आणि काळे मीठ घाला. आता हे मिश्रण चांगले मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर २-३ मिनिटे शिजवा.
एका प्लेटला बटर पेपर अथवा तूप लावून ग्रीस करा. नंतर त्यात संपूर्ण पेस्ट घाला. पेस्ट घट्ट झाले की त्याचे टॉफीच्या आकाराचे तुकडे करा. अशा प्रकारे 'जिंजर कँडी' खाण्यासाठी तयार आहे.
कँडीमध्ये ओलावा येऊ नये यासाठी, कँडीला साखर पावडरने कोट करा. कँडी टाइट कंटेनरमध्ये ठेवा. याने ते अधिक काळ टिकतील.